कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येवर तोडगा काढू

पिंपरी – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढणारी संख्या पाहता दोन्हीही आरटीओ कार्यालयात कर्मचारी संख्या कमी पडत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, शासनातर्फे जेवढी पदे मंजूर करण्यात आली आहेत, तितकी पदे भरली आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांवर पडणारा कामाचा अतिरिक्त बोजा पाहता त्याच्यावर परिक्षण करून तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिली.

परिवहन आयुक्त पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रथमच पुणे दौऱ्यावर आलेल्या शेखर चन्ने यांच्या हस्ते मोशी, प्राधिकरणातील पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आरटीओ कार्यालय इमारत, तसेच विविध विभाग, ब्रेक टेस्टींग ट्रॅक यांची पाहणी केली. त्याचप्रमाणे कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, कार्यालयीन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, संजय राऊत, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर आदी यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेखर चन्ने म्हणाले, राज्यात अजून पाच ते सहा आरटीओ कार्यालयाच्या स्वतंत्र इमारती बांधकाम करण्यात येणार असून त्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाला भेडसावत असलेल्या पार्कींगच्या जागेबाबत प्राधिकरणाशी बोलणे झाले आहे. त्यांच्याकडून पार्कींगसाठी आवश्‍यक आरटीओ कार्यालयासमोरील सुमारे पाच-सहा एकर जागा लवकरच घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कार्यालयातील लिफ्टचीही सुविधाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही गोष्टींसाठी आवश्‍यक निधी शासनातर्फे दिला जाणार आहे, असेही चन्ने म्हणाले.

तत्पूर्वी शेखर चन्ने यांनी नाशिक फाटा, भोसरी येथील केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेला (सीआयआरटी) भेट देवून तेथील कामकाजाची माहिती घेतली. त्यानंतर सीआयआरटीच्या जागेतच सुरू करण्यात आलेल्या वाहन चालन प्रशिक्षण आणि संशोधन (आयडीटीआर) संस्थेमध्ये सुरू असलेल्या वाहन चालन चाचणीची माहिती घेतली. सीआयआरटीचे संचालक राजेंद्र सनेर पाटील यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)