कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 150 जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट

अमित शहांचा आता कर्नाटकात अब की बार, भाजप सरकारचा नारा

बंगळूर -कर्नाटकमध्ये पुढील वर्षीच्या प्रारंभी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आजच एकप्रकारे प्रचाराचा बिगुल वाजवला. सध्या कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या कर्नाटकात त्यांनी अब की बार, भाजप सरकारचा नारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयरथ पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये कर्नाटकमध्ये पोहचेल. कर्नाटक जिंकून भाजप कार्यकर्त्यांनी दक्षिण भारतात भाजपचा रथ पुढे नेण्यास सज्ज रहावे, असे आवाहन यावेळी शहा यांनी केले. याआधी कर्नाटकच्या रूपाने भाजपने दक्षिण भारतात सर्वप्रथम सत्ता मिळवली. त्या राज्यात 2008 ते 2013 या कालवाधीत भाजपचे सरकार होते. मात्र, पक्षांतर्गत संघर्षामुळे भाजपला तीनवेळा कर्नाटकात मुख्यमंत्री बदलावा लागला. त्यानंतर त्या राज्यात कॉंग्रेसची सत्ता आली. आता विधानसभेच्या 150 हून अधिक जागा जिंकून कर्नाटकची सत्ता पुन्हा काबीज करण्याचे उद्दिष्ट भाजपने समोर ठेवले आहे.

देशभरातील विविध निवडणुकांत विजयी घोडदौड सुरू असल्यामुळे सध्या भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. त्यातूनच पक्षसंघटनेला अधिक मजबूत बनवण्यासाठी शहा यांनी 110 दिवसांचा देशव्यापी दौरा हाती घेतला आहे. या दौऱ्याचा भाग म्हणून आज ते कर्नाटकच्या तीनदिवसीय भेटीसाठी येथे दाखल झाले. यावेळी विमानतळावर स्वागतासाठी उपस्थित असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी भाषण केले.

भाजप एकजूट असून प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊन ती जिंकण्यास सज्ज असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. कर्नाटक भाजपला सध्या अंतर्गत गटबाजीने ग्रासले आहे. येडियुरप्पा यांच्या मनमानी कारभारावर पक्षातीलच काही नेते आक्षेप घेत आहेत. यापाश्‍वर्भूमीवर, पक्षाच्या एकजुटीसंदर्भात शहा यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)