कर्नाटक पोटनिवडणुकांचा कौल (अग्रलेख)

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना आणि पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच कर्नाटकात एकूण पाच मतदारसंघांत एकाच वेळी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. देशातील सद्य राजकीय स्थितीचे इंडिकेशन लक्षात येण्यासाठी या निवडणुकांचे निकाल महत्वाचे होते. या पाच पोटनिवडणुकांपैकी तीन जागा लोकसभेच्या तर दोन जागा विधानसभेच्या होत्या. कर्नाटकात भाजप आणि कॉंग्रेस आघाडी यांच्यात जवळपास बरोबरीचा सामना आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकांच्या निकालाविषयी कमालीचे औत्सुक्‍य होते. त्यात कॉंग्रेस-जेडीएस आघाडीने निर्विवाद यश मिळवून पाच पैकी चार जागा जिंकल्या आहेत.

भाजपला धक्का देणारा हा निकाल आहे. विशेषत: रेड्डी बंधूंचा प्रभाव असलेल्या व गेली अनेक वर्षे भाजपच्या ताब्यात असलेल्या बल्लारी लोकसभा मतदारसंघातील निकाल भाजपसाठी अधिक धक्‍कादायक आहे. तेथे कॉंग्रेसच्या व्ही. एस. उगरप्पा यांनी भाजपच्या जे. शांता यांचा एकतर्फी पराभव केला. जे. शांता या भागातील भाजपचे वजनदार नेते बी श्रीमालू यांच्या भगिनी आहेत. शिवाय हा मतदारसंघ 2004 पासून भाजपच्याच ताब्यात आहे. असे असूनही भाजपच्या उमेदवाराचा येथे जो दारुण पराभव झाला, त्याचे भाजपला वैषम्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय जनता पक्षाला केवळ शिवमोगाची जागा स्वत:कडे कायम राखण्यात यश आहे. तेथे पक्षाचे राज्यातील प्रमुख नेते बी. एस येडियुरप्पा यांच्या पुत्राने त्यांची जागा राखली आहे. मात्र, तेथेही येडियुरप्पापुत्र राघवेंद्र यांना अपेक्षित मताधिक्‍क्‍य मिळू शकलेले नाही. ही जागा येडियुरप्पा यांच्याकडेच होती. त्यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्या जागी ही पोटनिवडणूक घ्यायला लागली होती. ही एक जागा सोडली तर बल्लारी, मंड्या (दोन्ही लोकसभा मतदारसंघ) आणि रामनगर व जमखंडी (दोन्ही विधानसभा मतदारसंघ) या चारही ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे.

वास्तविक या राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कॉंग्रेस व जेडीएसचा धुव्वा उडवत लक्षणीय यश मिळवले होते. अतिशय थोड्या मतांनी त्यांचे बहुमत हुकले असले तरी विधानसभेत आजही भाजपच सर्वाधिक जागा मिळणारा पक्ष आहे. गेल्या मे महिन्यातच येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात भाजपला 224 पैकी 104 जागा मिळाल्या आहेत. असे असताना पोटनिवडणुकांच्या निकालात मात्र भाजपची मोठीच पिछेहाट झाली आहे. हे निकाल आता राष्ट्रीय निवडणुकांच्या संदर्भात चर्चिले जातील आणि त्याचा भाजपविरोधात वातावरण तयार करण्यात कॉंग्रेस व अन्य मित्र पक्षांना मोठाच लाभ होईल हे तर साहजिकच आहे.

भारतीय जनता पक्षाचा जोराने उधळलेला वारू असल्या एखाद्या राज्यातील पोटनिवडणुकांच्या निकालाने लगेच रोखला जाईल असा ठोस निष्कर्ष यातून एकदम काढता येणार नाही हे जरी खरे असले तरी भाजपसाठी आता सारे काही आलबेल राहिलेले नाही याचा संदेश या निवडणुकीतून मिळाला आहे हेही नाकारता येणार नाही. विरोधकांची भक्कम आघाडी झाली की भाजपला निवडणूक जड जाते हा जो नेहमीचा अनुभव आहे त्याची प्रचिती येथेही आली आहे. त्यामुळेच कर्नाटकच्या निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आघाडीचे राजकारण कामी आले असल्याचे म्हटले आहे. चिदंबरम हे कॉंग्रेसच्या वतीने देशभर आघाडी करण्यासाठी आग्रही आहेत, त्यामुळे त्यांनी या निकालाविषयी तातडीने आनंद व्यक्‍त करणे स्वाभाविक आहे.

आता लोकसभा निवडणूक केवळ चार-पाच महिन्यावर आली आहे. त्यामुळे विरोधकांची देशपातळीवर आघाडी करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याला तोंड देणे भाजपला अजिबातच सोपे राहिलेले नाही हा धडा त्या पक्षाला कर्नाटकच्या पोटनिवडणुकांनी दिला आहे. तसेही गेल्या लोकसभेत भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले असले तरी त्यांना त्यावेळी मिळालेल्या मतांची टक्‍केवारी केवळ 31 टक्‍के इतकी होती आणि भाजपच्या विरोधात नोंदवल्या गेलेल्या मतांची टक्‍केवारी 69 टक्‍के इतकी होती. भाजपच्या विरोधात पडलेली ही 69 टक्‍के मते विविध राजकीय पक्षांमध्ये विभागली

गेली होती. त्यामुळे भाजपचा विजय सुकर झाला होता. या पार्श्‍वभूमीवर विरोधीपक्षांमध्ये एकत्र येण्याची प्रक्रिया जोर धरू लागली असेल तर भाजपला आपल्या निवडणूक स्ट्रॅटेजीचा फेरविचार करावा लागणार आहे हा इशारा या पोटनिवडणूक निकालांनी दिला आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकारवरील अस्थिरतेचे संकटही या पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे काही काळ दूर झाले आहे. कारण लोकांकडून मतदानाच्या स्वरूपात मिळालेल्या कौलाचा राजकीय इम्पॅक्‍ट बराच काळ कायम राहात असतो. अन्यथा राज्यातील कॉंग्रेस-जेडीएस सरकार केव्हाही कोसळू शकते असे वातावरण भाजपने निर्माण केले होते, त्यालाही आता काही काळ चाप बसणार आहे. लोकांचा मूड पाहून भलते धाडस करण्यास आता भाजपला कर्नाटकात सध्या तरी वाव नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)