कर्नाटकात 12 मे रोजी मतदान, 15 मे रोजी निकाल!

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. एकाच टप्प्यात 56 हजार मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे. या निवडणुकीत 4.96 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

224 सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 28 मे रोजी पूर्ण होत आहे. कर्नाटकात सध्या 122 आमदारांसह काँग्रेस सत्तेत आहे. निवडणूक आयोगाने तारीख जाहीर करण्यापूर्वीपासूनच सर्व राजकीय पक्षांचा जोरात प्रचार सुरु आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह सध्या दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विविध टप्प्यांमध्ये प्रचार करत आहेत. काँग्रेसकडून मुख्यमंत्री सिद्धरामैय्या, तर भाजपकडून बीएस येडियुरप्पा मैदानात आहेत.

दरम्यान, कर्नाटकात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट दिसून आली होती. भाजपने कर्नाटकातील 28 लोकसभेच्या जागांपैकी 17 जागांवर विजय मिळवला. राज्यातील सत्ताधारी काँग्रेसला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले. तर जेडीएसने 2 जागा जिंकल्या होत्या. भाजपला 43 टक्के, काँग्रेसला 41.2 टक्के आणि जेडीएसला 11.1 टक्के मते मिळाली होती.

यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाचा मुद्दा चर्चेत असेल. कर्नाटकात दलितांनंतर लिंगायत सर्वात मोठा समाज असल्याचं बोललं जातं. इथे जवळपास 17 टक्के लिंगायत आहेत. काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच लिंगायत कार्ड खेळत लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला, ज्यावर अंतिम निर्णय केंद्र सरकारला घ्यायचा आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा ही जुनी मागणी आहे. याशिवाय कर्नाटकात मुस्लीम आणि वोक्कालिगा समाजाचीही निर्णायक भूमिका असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)