कर्नाटकात कॉंग्रेसच्या दोन आमदारांचे राजीनामे; कॉंग्रेस-जेडीएसपुढे पुन्हा पेच

बंगळुरू – कर्नाटकातील कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी आज सभापतींकडे राजीनामे सादर केल्याने राज्यातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या सरकारपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. या घडामोडींवर भाजपचे नेते लक्ष ठेऊन आहेत. रमेश जारकीहोली आणि आनंदसिंह अशी राजीनामा देणाऱ्या दोन आमदारांची नावे आहेत. प्रथम आनंदसिंह यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त येऊन धडकताच काही वेळाने रमेश जारकीहोली यांनीही आपला राजीनामा सादर केला.

राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना आनंदसिंह म्हणाले की राज्य सरकारने सरकारी जमीन जिंदाल उद्योग समुहाला दिल्याने माझ्या मतदार संघातील जनता नाराज आहे. त्यामुळे आपण या निर्णयाच्या विरोधात राजीनामा दिला आहे. या दोन आमदारांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील कॉंग्रेस आमदारांचे संख्याबळ आता 77 वर घसरले आहे. त्यामुळे 224 आमदारांच्या विधानसभेत राज्य सरकारकडे केवळ 114 आमदारांचेच पाठबळ उरले आहे.

सध्या मुख्यमंत्री कुमारस्वामी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथून दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटले आहे की टीव्हीवर मला या साऱ्या घडामोडी समजल्या आहेत. तरीही हे सरकार पाडणे हे भाजपचे दिवास्वप्नच ठरणार आहे. दरम्यान या पार्श्‍वभूमीवर राज्यात नव्याने निवडणुका होण्याची शक्‍यता भाजपचे नेते बी. एस येडियुरप्पा यांनी फेटाळून लावली आहे. त्यांनी म्हटले आहे की राज्यात पर्यायी सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते. त्यासाठी मध्यावधी निवडणुका घेण्याची गरज नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)