कर्तव्य दक्ष पोलीसदादांना हवीयं सीमेवर ट्रान्सफर ?

प्लस पॉइंटची वेळीच दखल आवश्‍यक: साईड पोस्टींगमुळे होतंय डिमोशन

सम्राट गायकवाड

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा,दि.25

जिल्हा पोलीस दलात विशेषत: आणि मोजक्‍या कर्तव्य दक्ष पोलीसदादांची संख्या वाढत आहे. साहजिकच त्यामागे कर्तव्य निभावलेल्या वर्षांचा दांडगा अनुभव अन पॉलिटीकल नेटवर्कींग हे त्यांचे प्लस पॉईंट. त्यामुळे अशा कर्तव्य दक्ष दादांवर कालपर्यंत मोहिमा यशस्वी करण्याची जबाबदारी होती. मात्र, मागील काही महिन्यांच्या कालावधीत अशा कर्तव्य दक्ष पोलीस दादांची कायदेशीर अपरिहार्यतेमुळे बदली करण्यात आली. परंतु कर्तव्य दक्षतेच्या प्रमाणपत्रांच्या जोरावर त्यांच्यावर आता सातारा शहरातील वाहतूक नियमन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सध्या नियमन करताना ते दाखवत असलेली कर्तव्य दक्षता सध्या सातारकर उघड्या डोळ्याने पहात आहेत अन अखेरीस एकच विचार करत आहेत. तो म्हणजे, कर्तव्य दक्ष पोलीस दादांचे साताऱ्यात डिमोशन होतयं. परिणामी या पोलीसदादांवर देशाच्या अथवा जिल्ह्याच्या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी सोपवायला हवी.

सातारा शहरात सध्या ग्रेड सेप्रेटरचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक वळविण्यात आली आहे. पर्यायी व अरूंद रस्त्यांवर वाहतूकीची कोंडींचा अनुभव नागरिक अन खुद्द वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घेत आहेत. परिणामी वाहतूक कोंडी दूर करून नियमन करण्याची जबाबदारी वाहतूक पोलीसांवर येत आहे. मात्र, सोबतीला होमगार्डचा मोठा फौजफाटा देण्यात आल्यामुळे प्रस्तुत कर्तव्य दक्ष पोलीस दादांना शौर्य दाखविण्यास वाव मिळत आहे.

त्यांचा अनेक प्रकारे अनुभव सातारकर नागरिक रोज घेत आहेत. विशेषत: गेली अनेक वर्ष साताऱ्यातील अनेक विभागात कार्यरत राहिलेल्या तसेच ग्रामीण पोलीस ठाण्यातून बदली झालेल्या दादांचा अनोखा अनुभव सातारकर नागरिकांना येत आहे. इतक्‍या वर्षाच्या दांडग्या अनुभवामुळे तुर्त अशा पोलीस दादांना वाहतूक पोलीसांच्या वर्दीवर पाहिल्यानंतर येथील सातारकरांना दु:ख होते. तसेच दु:ख प्रस्तुत पोलीस दादांना ही होत असावे. म्हणूनच की काय, ते सायंकाळ झाली तरी डोळ्यावरचा गॉगल काढायचा नाव काय घेत नाहीत.

साहजिकच नागरिक अन प्रस्तुत दादांच्या मनात दु:खाची भावना समान आहे. ती भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच समजून घ्यायला हवी. नागरिकांच्या मनात त्यांच्या प्रती शौर्याची देखील भावना आहे. कारण, आजपर्यंत त्यांनी कर्तव्य निभावलेली ठिकाणे अन दाखविलेल्या सिंघम स्टाईलने नागरिकांच्या मनात घर निर्माण केले आहे.

त्यामुळे अशा पोलीस दादांना देशाच्या रक्षणासाठी सीमेवर पाठविता येईल का, असा पहिला पर्याय निर्माण होतो. मात्र, त्यामध्ये साहजिकच कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. परंतु कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी प्रसंगी शासनाने कायद्यात बदल करायला हवा. लोकसभेची आचारसंहिता लागण्यास अद्याप काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे कायद्यात बदल करण्यासाठी संसदेचे एक दिवसाचे अधिवेशन निमंत्रित करायला हवे.

कारण, असे कर्तव्य दक्ष पोलीस दादा हे साताऱ्यातील प्रातिनिधीक उदाहरण आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक कर्तव्य दक्षतेची उदाहरणे पहायला मिळतात. त्यामुळे कायद्यात बदल केला गेला तर त्याचा लाभ देशातील अशा कर्तव्य दक्ष पोलीस दादांना मिळणार आहे. मात्र, ते शक्‍य नाही झाले तर जिल्ह्यात अनेक संवेदनशील अन दुर्गम पोलीस ठाणे, दूरक्षेत्र आहेत. त्या ठिकाणी असलेल्या जनतेला अशा कर्तव्य दक्ष पोलीस दादांची खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यामुळे सर्वार्थाने नागरिकांच्या भावनेची दखल वेळीच घेतली गेल्यास खऱ्या अर्थाने न्याय होणार आहे.

 इंटेलिजन्सचा होईल फायदा
प्रस्तुत पोलीस दादांचे रेकॉर्ड पाहिले तर इंटेलिजन्स (गुप्तहेर) स्टाईल इतरांपेक्षा सतत वेगळी राहिली आहे. त्याचा लाभ त्यांनी कधी ही स्वत:साठी केला, असे दिसून आले नाही. त्याचाच परिणाम म्हणून त्यांना कायम महत्वाच्या विभागात पोस्टींग देण्यात आल्याचे दिसून येते. मात्र, आता त्यांची नेमणूक थेट साताऱ्याच्या वाहतूक शाखेत करण्यात आली आहे. साहजिकच त्यामुळे वाहतूक पोलीसांचा गणवेश घालण्याची अपरिहार्यता ओढावली गेली आहे. मात्र, वाहतूक शाखेत कार्यरत झाल्यापासून त्यांनी स्वत:च्यातील कर्तव्य दक्षता इंचभर देखील कमी होवू दिली नाही. त्याचा प्रत्यय येथील सातारकर नागरिक रोज घेत आहेत. त्यामुळेच प्रस्तुत पोलीस दादांची खरी गरज देशाच्या सीमेवर आहे. जेणे करून त्यांच्या इंटेलिजन्सचा मोठा फायदा शासनाला होईल, अशी प्रतिक्रिया अनुभवार्थी नागरिकांनी व्यक्त केली.

 त्या उपाधीने फेमस
दरम्यान, प्रस्तुत कर्तव्य दक्ष पोलीस दादांपैकी एकाची माहिती घेतली. तेव्हा त्यांच्या कर्तव्य दक्षतेचे अनेक दाखले समोर आले. त्यापैकी प्रस्तुत पोलीस दादाला पैसा ही उपाधी देण्यात आली आहे. कारण, त्यांनी नोकरीच्या कारर्किदीत कधी पगाराविना इतर पैशाला हात लावला नसल्याचे सांगण्यात आले. तर दुसऱ्या पोलीस दादांचे साताऱ्यात मोठे पॉलिटीकल नेटवर्क आहे. मात्र, कर्तव्य बजावताना त्यांनी कधी ही नेटवर्क आड येवू दिले नाही. यावरून त्यांची कर्तव्याप्रती असलेली प्रामाणिकता अधोरेखित होत असून त्याची दखल वरिष्ठांनी घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)