कर्तव्य टाळणाऱ्यांना यापुढे सैन्यात स्थान नाही

लष्करप्रमुख रावत यांचा इशारा : दिव्यांग सैनिकांचा सत्कार

पुणे – “भारतीय सेनेतील जे जवान सक्षम असून, विकलांग असल्याचे कारण देत सीमेवर तैनात होण्यास नकार देतात, अशा ढोंगी जवानांना सैन्यात स्थान नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब अशी खोटी वैद्यकीय कारणे देऊन सीमेवर, खडतर, अडचणीच्या ठिकाणी कर्तव्य बजावण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना येत्या काळात लष्कराच्या मुख्यालयातून थेट कारवाई केली जाईल,’ असा इशारा लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी गुरूवारी येथे दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दक्षिण मुख्यालयाच्या वतीने इयर ऑफ डिसेबल्ड सोल्जर्स इन लाइन ऑफ ड्युटीनिमित्त आयोजित सन्मान समारंभात दिव्यांग सैनिकांचा सत्कार रावत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी उपस्थित होते.

भारतीय लष्करात सेवा बजावताना अपंगत्व आलेल्या देशभरातील 657 सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी लष्कराला सहकार्य करणाऱ्या ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी आणि डॉ. प्रेम दरयानानी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात “मिरॅकल्स ऑफ व्हिल्स’ या दिव्यांग सैनिकांच्या समूहाने नृत्यनाटिका सादर केली. तर, काही दिव्यांग सैनिकांनी “इतनी शक्ती हमे देना दाता’ या गाण्याचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.

लष्करप्रमुख म्हणाले, “दिव्यांग सैनिकांना कशाप्रकारे मदत देता येईल, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. या सर्व सैनिकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनाही सोबत घेतले जात आहे. देशातील कोणत्याही दिव्यांग सैनिकाला समस्या जाणवत असेल, तर त्याने लष्कर मुख्याल्यास कळवावे. एक महिन्यात त्यांच्या समस्येचे निराकरण केले जाईल. खोटी वैद्यकीये कारणे दाखवून काहीजण लष्कराकडून दिव्यांग पेन्शन मिळवतात ही बाब खेदजनक आहे. दिव्यांग सैनिकांना मदत करणे हे भारतीय लष्कराचे कर्तव्य असून ते यापुढील काळातही केले जाणार आहे,’ असे रावत यांनी सांगितले.

आत्मविश्‍वास असणाऱ्यांचे सैन्यात स्वागत
केवळ नोकरी पाहिजे असेल, तर रेल्वेत जा किंवा स्वतःचा व्यवसाय करा. मात्र, त्यासाठी सैन्यात दाखल होऊ नका. सैन्याची नोकरी करायची असेल, तर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्‍यक आहे. खडतर आणि अडचणीच्या ठिकाणी काम करण्याचा आत्मविश्‍वास असल्यास सैन्यात तुमचे स्वागत आहे, असाही सल्ला रावत यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)