कर्डिलेंनी घात केला, “सोधा’साठी षड्‌यंत्रात अडकविले ; राष्ट्रवादीचे दादा कळमकर यांचा आरोप

 जगताप पिता-पुत्रांचा नामोल्लेख टाळून राष्ट्रवादी पक्ष संपविण्याचा आरोप

नगर: “आमदार शिवाजी कर्डिले यांनी माझ्याभोवती मैत्रीमध्ये राजकीय षड्‌यंत्र रचले. त्यात मी अडकलो, त्याची जाणीव उशिरा झाली. शिवाजी कर्डिले यांनी मैत्रीत घात केला आहे. महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसची झालेली युती ही अभद्र, अशीच आहे. या युतीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस बदनाम झाली आहे. ते (आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांचे नाव टाळून) भाजपसारख्या कोणत्याही पक्षात जाऊ शकतात. मी मात्र शरद पवार यांचा कार्यकर्ता आहे. शहरासह जिल्ह्यात मी पक्ष संभाळू शकतो, याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना महापौर निवडणुकीवेळी आमदार शिवाजी कर्डिले यांनी माझ्या घरी आणून, त्याचे छायाचित्र काढून ते व्हायरल केले. यामागे शहरात “सोधा’ राजकारण टीकविण्याचे शिवाजी कर्डिले यांचे राजकीय षड्‌यंत्र आहे,’ अशी टीका राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार दादा कळमकर यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दादा कळमकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपशी केलेल्या युतीवर भूमिका स्पष्ट केली. यावेळी माजी महापौर अभिषेकर कळमकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कळमकर म्हणाले, “महापालिका निवडणूक निकालानंतर केवळ पक्षांतर्गत निर्णयासाठीच्या बैठकांना मी हजर होतो. भाजपला साथ देण्याच्या निर्णयाची कल्पनाही मला नव्हती. मात्र, आज पक्षश्रेष्ठींसमोर निव्वळ माझी बदनामी व्हावी, या उद्देशाने उलट-सुलट माहिती समाज माध्यमांतून पसरवली जात आहे. निर्णयाशी माझा संबंध असल्याचे सांगणाऱ्यानी शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीसमोर हात ठेवून सांगावे, असे आव्हान देत विरोधक नव्हे तर पक्षातीलच काही जण हे कृत्य करत आहेत, पण पक्षाच्या नेत्यांनाही याची जाणीव असून या उद्योगांचा फायदा होणार नाही. महापालिकेतील भाजप-राष्ट्रवादीची युती ही अभद्रच आहे, यामुळे पक्ष डॅमेज झाला आहे.’

महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिलेल्या पाठिंब्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक अडचणीत आले आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही आमदार जगताप यांच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करून कारवाईचा इशारा दिला आहे. या मुद्यावर पक्षांतर्गत धुसफूस सुरू असतानाच कळमकर यांच्या संमतीनेच हा निर्णय झाल्याचे वृत्त पुढे आले होते. कळमकर यावर म्हणाले, ‘भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी मंत्री गिरीश महाजन यांना माझ्या घरी आणले. घरी कुणी आल्यावर आपण त्यांचे स्वागत करतो, ही आपली संस्कृती आहे.

मात्र, आमदार कर्डिले हे घरी येताना समवेत पुष्पगुच्छ घेऊन आले होते. आल्यावर त्यांनी माझा स्वत:हून सत्कार केला व त्याचे छायाचित्राचा दुरूपयोग करण्याच्या उद्देशाने समाज माध्यमांवर व्हायरल केले गेले. तसेच प्रसारमाध्यमांना पाठविले गेले. महाजन यांना घरी आणून छायाचित्र काढणे, ते व्हायरल करणे कशासाठी होते, हे मला नंतर कळाले. हे कृत्य चुकीचे असून एक प्रकारे आमदार कर्डिले यांनी हे षडयंत्र केले म्हणा अथवा मैत्रीचा गैरफायदा घेतला म्हणता येईल. माझ्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर मी काही माध्यमांकडे माझी भूमिका मांडली. मात्र मी न बोललेले शब्दही त्यात घातले गेले.या सर्व घडामोडी पक्षाच्या वरिष्ठांकडे निदर्शनास आणून दिल्या आहेत.’


अभद्र युतीमुळे राष्ट्रवादी डॅमेज

महापालिकेमध्ये भाजपबरोबर केलेली युती ही अभद्रच आहे. यामुळे राष्ट्रवादी डॅमेज झाली आहे. राज्यातच नव्हे तर देशपातळीवर शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला या निर्णयाचा धक्का बसल्याचे दादा कळमकर म्हणाले. निवडणूक निकालानंतर भाजपला पाठिंबा देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका मी आमदार अरूण जगताप यांच्याकडे मांडली होती. त्यानंतर पक्षाच्या तीन बैठक झाल्या. तेव्हाही मी हजर होतो. त्यात भाजपशी आघाडीबाबत कुठलीही चर्चा नव्हती. मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपच्या बसमधून उतरल्यावर मला या निर्णयाची माहिती मिळाली, असे कळमकर यांनी सांगितले.


पक्षच त्यांच्याविरोधात पावले उचलेल

आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेतही भूमिका मांडताना भाजपला पाठिंब्याचा निर्णय हा त्यांचा व नगरसेवकांचाच असल्याचे स्पष्ट केल्याकडे दादा कळमकर यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना शिवसेनेबद्दल आकस होता, असे त्यांनी पवारांना सांगितले होते. याबाबत आता पक्षच कारवाई करेल, असेही कळमकर यांनी सांगितले.


लोकसभेसाठी नाव पुढे आल्याने बदनामी

राजकारणापलीकडे अनिल राठोड, दिलीप गांधी, अभय आगरकर यासह कॉंग्रेस नेत्यांशी माझी मैत्री आहे. एकमेकांविरोधात अशा टोकाच्या भूमिका आम्ही घेतल्या नाहीत. आज पक्षाकडे लोकसभेसाठी माझे नाव पुढे आल्यानंतर पक्षातीलच काहीजण पुन्हा माझ्या बदनामीचा प्रयत्न करीत आहेत, असा टोला दादा कळमकर यांनी आमदार जगतापांचे नाव न घेता लगावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)