कर्ज काढून होतात लग्न…

अजूनही आपला समाज
समजूतदारपणे नाही वागत
परिस्थिती बिकट असली तरी
विवाह साध्या पद्धतीने नाही लागत
बडेजाव मिरविण्यासाठी
कर्ज काढून होतात लग्न
कर्ज फेडता फेडता बिचाऱ्यांना
कठिण होऊन जाते जगणं
प्रत्येकजण आपल्याच
दिखाऊ प्रतिष्ठेत आहे मग्न
अनेकदा लाडक्‍या कन्येचेही
सुखी संसाराचे स्वप्न होते भग्न
जमीन जुमला दागिने विकून
विवाह समारंभ होतात थाटात
कर्ज फेडतांना आयुष्यभर बेजार
चटणीभाकरीही पडत नाही ताटात
स्वतःच्या हक्काच्या घरासमोरच
काही वर्षांपूर्वी लग्न लागायचे
आर्थिक सुबत्ता असली तरी
लोक साधेपणानेच वागायचे
आतिषबाजी लखलखाट
लाखो रुपयांचा खर्च मोठा
पाहुण्यांना माहितच असते
सर्व बडेजाव आहे खोटा
आज सगळ्याच निमंत्रितांना
शाही फेटे बांधले जातात
भोजनाच्या पंगती बसत नाहीत
उभ्या उभ्यानेच सारे खातात
टीव्ही वरील मालिका पाहून
आपणही अनुकरण करतो
विवाहातील मांगल्य हरवले
वधुला उचलून वर धरतो
अन्नाची प्रचंड नासाडी करुन
वृथा दाखवितो आपण माज
समाजात अनेकजण उपाशी
का वाटत नाही आपणांस लाज
आपण सारे शिकलो सवरलो
याचा नेमका अर्थ तरी काय
समाज स्वतःच्या कोशात जगतोय
प्रत्येकाचे मातीचेच आहेत पाय
हुंडा देणेघेणे होतच नाही
मनाला पटतच नाही हेच खरे
रोख हुंडा दिला जात नसेल
पण सोने देतात की नाही बरे
शाही विवाह समारंभात
एखाद्या गरीबाचेही लग्न लावा
समाजात परीवर्तन होऊ शकते
हा समाजधुरीणांचा आहे दावा
– विजय वहाडणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)