कर्जापायी मुलाचे अपहरण

– पाच लाखांची मागितली खंडणी

पिंपरी – डोक्‍यावर कर्जाचा डोंगर आणि त्यात लहान भावाचे लग्न अशा परिस्थितीत सापडलेल्या एका तरुणाने मित्राच्या मदतीने पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना वाकड येथे घडली. पोलिसांनी चार दिवसांमध्ये दोन्ही आरोपींना जेरबंद केले. त्यांनी मुलाच्या वडिलांकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणी शाहरुख मिराज खान (वय-26, रा. चिंचवड) व मोहम्मद शकील सलीम खान (वय-32, रा. मुंबई) या दोघांना जेरबंद करण्यात आले आहे. तर सुफियान नासिर खान (वय-5, रा. कुणाल रेसिडेन्सी सोसायटी, थेरगाव) असे त्यांच्या तावडीतून सुटका झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 4) दुपारी सुफियान हा कुणाल सोसायटीच्या पार्किंगमध्ये मित्रांसोबत खेळत होता. यावेळी दुचाकी वरुन आलेल्या एका इसमाने, सुफियान गाडी पे बैठ असे म्हणून सोबत नेले. काही वेळाने सुफीयान न दिसल्याने त्याच्या आईने त्याचा शोध घेतला तेव्हा तो नसल्याचे आढळून आले. त्यानंतर खान कुटुंबियांनी याबाबत वाकड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु केला असताना त्यांचे धागेदोरे शाहरुख व मोहम्मदपर्यंत पोहचले. सापळा रचून शिताफिने पोलिसांनी त्याला जेरबंद केले.

चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे राहणाऱ्या शाहरुख मिराज खान या तरुणाचे झम झूम केटरर्स आणि बिर्याणी हाऊस आहे. शाहरुखच्या दुकानाच्या बाजूला सुफियानच्या आईचे ब्युटी पार्लर आहे. सुफियानही आईसोबत ब्युटी पार्लरमध्ये येत असल्याने त्याची शाहरुखशी ओळख झाली होती. याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुफियान त्याच्या आई-वडिलांसह राहत होता. सुफियानची आई शाहेदा खान यांनी शाहरुखला वेळोवेळी आर्थिक मदत केली होती. पण आता मदत करणार नाही, असे तिने शाहरुखला सांगितले होते.

शाहरुखच्या लहान भावाचे लग्न ठरले होते. आधीच डोक्‍यावर कर्जाचा डोंगर आणि त्यात लहान भावाच्या लग्नासाठी पैशांची गरज अशा संकटात शाहरुख सापडला होता. यातून बाहेर पडण्यासाठी शाहरुखने सुफियानच्या अपहरणाचा कट रचला. त्याने मुंबईतून मोहम्मद शकील सलीम खान या मित्राला बोलावून घेतले. मात्र, पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला. मुलाला आईकडे सोपवताच त्या मातेला रडू आवरता आले नाही. पोलिसांनी मला व माझ्या मुलाला नवीन जन्मच दिला अशा भावना आईने यावेळी व्यक्त केली.

अशी केली सुटका
दोन दिवसांनी शाहरुखने सुफियानच्या आईला फोन करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. 7 नोव्हेंबर रोजी पैसे घेऊन चिंचवडमधील बस स्थानकात या, असे त्याने सुफियानच्या आईला सांगितले होते. यानुसार पोलिसांनी सापळा रचून शाहरुखला अटक केली. वाकडमधील नऊ पोलीस अधिकारी आणि जवळपास 50 कर्मचाऱ्यांनी सुफियानची सुखरुप सुटका व्हावी, यासाठी अथक मेहनत घेतली. या कामगिरीसाठी खान कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)