पिंपरी – कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची तब्बल साडे बारा लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अनिता राजेश पासवान (वय-30, रा. भोसरी) या महिलेने फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना डिसेंबर 2017 मध्ये एकाचा फोन आला.
बजाज फायनान्समधून बोलत असून तुम्हाला तुमच्या विम्यावर कर्ज मिळू शकते, अशी बतावणी केली. फिर्यादी यांनी त्याला 28 लाख रुपयांच्या कर्जाची आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्ज मिळवून देण्यासाठी आरोपीने त्यांना शुल्क भरावे लागणार असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेऊन फिर्यादी यांनी डिसेंबर ते जुलै या कालावधीत तब्बल 12 लाख 66 हजार 250 रुपये संबंधित खात्यामध्ये ऑनलाईन हस्तांतरित केले. मात्र त्यानंतर कर्जासाठी पाठपुरावा केला असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा