कर्जाचे ओझे 

भारतात घर खरेदी करण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी बहुतांश लोक बॅंकेकडून कर्ज काढत असतात. गृहकर्ज घेतल्यानंतर संबंधित व्यक्‍तीला ते कर्ज फिटेपर्यंत डोक्‍यावर मोठे ओझे घेऊन वावरावे लागते. त्यामुळे अनेकजण गृहकर्ज मुदतीपूर्वीच फेडण्याचा प्रयत्न करत असतात. बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार गृहकर्ज वेळेपूर्वी फेडले तर ग्राहकाला त्यातून फायदा होतो. याचे कारण आपल्याला व्याजाच्या रूपाने बॅंकेला मोठी रक्‍कम भरावी लागते. 20, 25 वर्षे एवढ्या मुदतीसाठी गृहकर्ज घेतले असेल तर एवढ्या काळात आपण व्याजरूपाने त्या बॅंकेकडे किती पैसे भरतो याचा विचार ग्राहकांनी करायला हवा.
काही जणांच्या मते गृहकर्जामुळे ग्राहकाला आयकरातून सुट मिळत असते. त्यामुळे त्याने मुदतीअखेरपर्यंत गृहकर्ज फेडत राहिले पाहिजे. जर मुदतीआधी गृहकर्ज फेडले तर ग्राहकाचे नुकसान होऊ शकते. कारण त्याला आयकर भरावा लागतो असे या मंडळींचे मत असते. यातला कोणता पर्याय निवडायचा असा प्रश्‍न सामान्य माणसापुढे पडतो. जर तुम्हाला एखाद्या मार्गाने मोठी रक्‍कम मिळाली तर तुम्ही संबंधित बॅंकेत जाऊन आपली गृहकर्जाची शिल्लक रक्‍कम किती आहे हे जाणून घ्या.
कर्जाची मुदतीआधी परतफेड करायचीच असा निर्धार असेल तर बॅंकेकडून शिल्लक रकमेचा निश्‍चित आकडा मागवून घ्या. बॅंकेला आपण एक पैसाही देणे राहिलेलो नाही याची दोन तीन वेळा खात्री करून घ्या. बॅंकेकडून आपली किती बाकी आहे हे लिखित स्वरूपात घेतल्यास उत्तम ठरते. बॅंकेकडून मिळालेल्या पत्राच्या आधारे आपण कर्जाची उर्वरित रक्‍कम भरू शकतो. आपण कर्जाची उर्वरित रक्‍कम संपूर्णपणे भरल्यानंतर त्या बॅंकेकडे/ वित्त संस्थेकडे घरासंबंधीची सर्व कागदपत्रे परत मागितली पाहिजेत. कर्ज घेताना बॅंकेने आपल्याकडून घरासंदर्भातील सर्व कागदपत्रांची मूळ नक्‍कल (ओरिजनल कॉपी) घेतलेली असते. ही मूळ कागदपत्रे बॅंकेकडून मागून घ्या.
बॅंकेकडे कोणतीही कागदपत्रे राहिलेली नाहीत याची खात्री करून घ्या. बॅंकेकडून जर झेरॉक्‍स प्रती दिल्या जात असतील तर त्या घेऊ नका. मूळ कागदपत्रांसाठीच आग्रह धरा. तुमच्या कर्जाच्या बाकी रकमेचा धनादेश वठल्यानंतरच बॅंकेकडून तुम्हाला घरासंबंधीची कागदपत्रे दिली जातात. बॅंकेला तुम्ही दिलेला चेक वठल्यानंतर बॅंकेकडून नो ऑब्जेक्‍शन सर्टिफिकेट (ना हरकत प्रमाणपत्र) घेण्यास विसरू नका. तुम्ही बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची पै न पै चुकवली आहे हे बॅंकेच्या ना हरकत प्रमाणपत्रावरून सिद्ध होत असते. त्याचबरोबर बॅंकेकडून आपण सर्व कर्ज फिटले असल्याचे वेगळे पत्रही मागू शकतो.
बॅंकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतर निबंधक कार्यालयात जाऊन तेथील कागदपत्रे ताब्यात घेतली पाहिजेत. कारण त्या कागदपत्रांवर घराची मालकी ही कर्ज देणाऱ्या बॅंकेच्या / वित्त संस्थेच्या नावाने असते. त्याकरिता निबंधक कार्यालयात आपल्याला अर्ज द्यावा लागतो. त्या अर्जाबरोबर बॅंकेकडून मिळालेले ना हरकत प्रमाणपत्र जोडावे लागते. गृहकर्ज फेडल्यानंतर आपला क्रेडिट स्कोअर किती आहे हे तपासून पाहा. क्रेडिट रेटिंग एजन्सीमध्ये आपल्याला क्रेडिट स्कोअरबद्दल माहिती मिळू शकते.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)