कर्जमाफी प्रेम की नाईलाज ?

File photo

आमदार बाळासाहेब थोरात

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34 हजार कोटी रुपये कर्जमाफी घोषित केली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी आहे असे नगारे पिटले. त्यातील त्रुटी आम्ही दाखवायचा प्रयत्न केला; पण आमचे काही ऐकायचेच नाही, असा त्यांचा ठाम निर्णय असल्यामुळे आमचा आवाज त्या ढोल ताशांमध्ये विरुन गेला.

स्टेट लेव्हल बॅंकर्स कमिटीचा (एसएलबीसी) चालू वर्षीचा 70 पानी अहवाल काल हातात पडला. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे यंदा कर्जाची उचल मोठ्या प्रमाणावर घसरली असून त्यामुळे उलट शेतकरी आणि बॅंकर्स दोघेही अडचणीत आले आहेत, असा स्पष्ट निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. एसएलबीसी या समितीत राज्य सरकार, नाबार्ड आणि रिझर्व्ह बॅंकेचे अधिकारी असतात. दर तीन महिन्यांनी तिची आढावा बैठक होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री असावेत असा रिवाज आहे. सबब तिच्या अहवालाबद्दल आणि विश्‍वासहार्ततेबद्दल शंका घ्यायला जागा नाही. थोडक्‍यात आम्ही विरोधी पक्ष ही खोटी हाकाटी पेटत आहोत, असे म्हणायला मुख्यमंत्र्यांना वाव नाही. हे सोनाराने टोचलेले कान आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अहवालातील आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. 2015-2016 मध्ये शेती कर्ज वाटपात 30 टक्के, तर 2016-2017 मध्ये 33 टक्के वाढ झाली; पण 2017-2018 मध्ये 77 हजार 207 कोटी रुपयांवरून ती 48 हजार 857 कोटी रुपये इतकी म्हणजे 40 टक्‍यांनी खाली घसरली. बॅंकांच्या दृष्टीने पाहता त्यांनी शेती कर्जासाठी जी रक्कम निर्धारित केली होती, त्यापैकी फक्त 47 टक्के लक्ष्य त्यांना गाठता आले. सरकारने कर्जमाफीसाठी लादलेल्या अतार्किक आणि आचरट अटी आणि त्यात झालेली अक्षम्य दिरंगाई आणि भीक नको पण कुत्रे आवर अशी झालेली शेतकऱ्यांची अवस्था यामुळे झालेला हा सत्यानाश आहे, असे आमचे मत आहे. प्रत्येक वेळी दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ, ज्यांची कर्जे त्यापेक्षा जास्त आहेत, त्यांनी आधी अनुशेष फोडून ती दीड लाखांपर्यंत आणायची, एका घरात दोन कर्जमाफ्या नाहीत, घरात कुणी सरकारी नोकरीला असेल तर कर्जमाफी नाही, अशा या जाचक अटीत कर्जमाफी अडकली.

मराठवाड्यातील एका विधवा स्त्रीचा मुलगा भारतीय लष्करात जवान आहे. ती सरकारी नोकरी असल्याने तिला कर्जमाफी नाकारली. सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी आपले पंतप्रधान मिळेल तेव्हा अश्रू गाळतात, ते किती खोटे असतात याचा आणखी काय पुरावा हवा? बॅंकांची पंचायत आणि बळीराजाची परवड यात खासगी सावकारांचे उखळ मात्र पांढरे झाले. पार्थ एमएन नावाचे एक तरुण अभ्यासू पत्रकार आहेत.

अमेरिकेतील लॉन्स एजेंलिस टाईम्स या मोठ्या दैनिकाचे ते भारतातील वार्ताहर आहेत. शेती हा त्यांचा आवडीचा विषय. त्यांच्या मते आधीच्या थकीत कर्जामुळे जे शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले नाहीत, ते आज खासगी सावकारांची कर्जे चक्रवाढ व्याजाने फेडत आहेत. सावकारांच्या गुंडापासून जीव लपवून जगत आहेत. पुढच्या वर्षी परिस्थिती सुधारेल असे धरून चालले, तरी हे शेतकरी कर्जाच्या विळख्यातून सुटणार नाहीत. एकूणच हा अहवाल वाचल्यानंतर शंका येते, की कर्जमाफी ही खरोखरच बळीराजाच्या प्रेमापोटी, आस्थेपोटी होती की चहुबाजूने आलेल्या दबावामुळे? इच्छा नसतानाही नाईलाजाने घेतलेला निर्णय होता?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)