कर्जमाफी अर्ज भरण्यासाठी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना अडचणी

  • गावांची नावे दिसत नसल्याने फॉर्म भरता येत नाही

सोमाटणे, (वार्ताहर) – कर्जमाफीचे फोर्म भरण्यासाठी तालुक्‍यातील काही गावांची नावे दिसत नसल्याने शेतकऱ्यांना फॉर्म भरण्यात अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच फॉर्ममधील अनावधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्याची यंत्रणा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना फॉर्म भरताना अडथळा निर्माण झाला आहे. तालुक्‍यातील पवन मावळातील गहुंजे, साळुंब्रे, सांगवडे, दारुंब्रे, शिरगाव, धामणे, उर्से व इतर अशा गावांची नावे सध्या शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर दिसत नाहीत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना फॉर्म भारता येत नाही.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती आपले सरकार या वेबसाईटवर भरण्यास सुरुवात मागील आठवड्यात सुरुवात झाली. यासाठी महा ई सेवा केंद्र व ग्रामपंचायतीच्या संग्राम कक्षातर्फे ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. परंतु बहुतांश ठिकाणी हे महा ई सेवा केंद्र व ग्रामपंचायतीची संग्राम कक्ष चालू नसल्याने शेतकरी फॉर्म भरण्यासाठी गोंधळून गेला आहे.

ज्या ग्रामपंचायतीमध्ये हे फॉर्म भरण्याचे काम सुरु आहे. तेथे सर्वत्र व्यवस्थित सुस्थितीत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे दिवसभरात फॉर्म भरण्यावर मर्यादा येत असून, दिवसभरात 20-25 फॉर्म भरले जात आहेत. फॉर्म पूर्ण भरून झाला तर फॉर्मची प्रिंट लोड होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रिंट घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी बोलावले जात आहे.
काही फॉर्मच्या बाबतीत सर्वरवर फॉर्म भरताना आपोआप काहीतरी चुकीची माहिती सेव होत असल्याने आपण कर्ज माफीच्या योजनेतून बाहेर फेकले जावू, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. तर चुकीची दुरुस्ती करण्याची यंत्रणा अद्याप वेबसाईटवर उपलब्ध नसल्याने फॉर्म चुकलेले शेतकरी सध्या हवालदिल झाले आहेत. याचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांनी आधार नोंदणी सुरु झाली त्यावेळेस आधार कार्ड काढले असल्याने त्यावेळी मोबाईल नंबर आधारला लिंक केला नव्हता तसेच काहीचा मोबाईल नंबर बदलला असल्याने ओटोपी क्रमांक मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. आधार कार्डला मोबाईल नंबर जोडला नसल्याने मोबाईलवर ओटीपी क्रमांक येत नाही त्यामुळे हे फॉर्म महा ई सेवा केंद्रातच बायोमेट्रिक मशीनवर बोटाचे ठसे देवून भरावा लागत आहेत.

कर्ज जरी पती किंवा पत्नी यापैकी एकाच्याच नावावर असले तरी फोर्म भरण्यासाठी पती व पत्नी दोघेही लागत असाल्याने शेतकऱ्यांना दोघांनाही रांगेत उभे राहावे लागत आहे. यासाठी शेतीची कामे सोडून तालुक्‍याच्या ठिकाणी चालू असल्येल्या महा ई सेवा केंद्रात सकाळी लवकर येवून नंबर लावावा लागत आहे. सायबर कॅफेत, खासगी संगणकावर ऑनलाईन फोर्म भरण्यासाठी 100 ते 200 रुपये आकारले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे शेतीलील काम बुडत असून, आर्थिक भुर्दंड देखील सहन करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)