कर्जमाफीसाठी 45 लाख 59 हजार शेतकऱ्यांची नोंदणी

मुंबई – राज्य सरकारने मुदतवाढ दिल्यानंतर कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत राज्यभरातील सुमारे 45 लाख 59 हजार 327 शेतकऱ्यांच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी झाली आहे. ही आकडेवारी 31 ऑगस्टपर्यंतची असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

नापिकी व सततच्या दुष्काळामुळे नैराश्‍येच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्‍यावरील वाढलेला कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहिर केली. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून 24 जुलैपासून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली. आपले सरकार केंद्र, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम केंद्र आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था येथून हे ऑनलाईन अर्ज भरून घेतले जात आहेत.

या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी आतापर्यंत तीनवेळा या योजनेला मुदतवाढ देण्यात आली. या योजनेत 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत 45 लाख 59 हजार 327 शेतकऱ्यांच्या अर्जाची ऑनलाईन नोंदणी झाली असून 38 लाख 90 हजार 404 शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली.

आता ही मुदत 15 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली असून या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असेही देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)