कर्जमाफीसाठी झटताना शेतकऱ्याचा मृत्यू

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महा ई-सेवा केंद्राबाहेर रांगेत हृदयविकाराचा झटका
खेड तालुक्‍यातील वाडा येथील दुर्घटना
राजगुरुनगर  -कर्ज माफीचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महाईसेवा केंद्राच्या बाहेर रांगेत उभे असताना हृदयविकाराच्या झटक्‍याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्‍यातील वाडा येथे आज (दि. 11) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
शंकर मारुती ठोकळ (वय 67, रा. सरेवाडी, नायफड, ता. खेड) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आज (दि. 11) सकाळी खेडच्या पश्‍चिम भागातील शे-दोनशे शेतकरी कर्जमाफी अर्ज भरण्यासाठी वाडा येथील सुविधा केंद्रात आले होते. येथील महा ई सेवा केंद्रात कर्जमाफी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी नायफड गावाच्या सरेवाडी येथील शंकर मारुती ठोकळ हे शेतकरी गावातील शेतकऱ्यांसह सकाळी अकरा वाजल्यापासून रांगेत उभे होते. आज काहीसे उन असल्याने गर्मी जाणवत होती; मात्र तरीही शेतकरी महा-ई-सेवा केंद्राबाहेर रांगेत कर्जमाफी अर्ज टोकनप्रमाणे उभे होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शंकर मारुती ठोकळ यांच्या छातीत दुखू लागल्याने ते शेतकऱ्यांची रांग सोडून बाजूला झाले आणि खाली बसले. मात्र त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ त्यांना येथील प्राथमिक केंद्रात हलवले; मात्र ते मृत झाल्याचे येथील डॉक्‍टरांनी सांगितले.

रांगा लावूनही शेतकऱ्यांची ससेहोलपट
वाडा येथे असलेल्या सुविधा केंद्रामध्ये खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील मोठ्या संख्येने नागरिक कर्जमाफी अर्ज भरण्यासाठी येत आहेत. मात्र सुविधा केंद्रात नेटवर्क डाउन असल्याने शेतकऱ्यांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे. खेड तालुक्‍यातील पश्‍चिम भागामध्ये शासनाचे महा ई सेवा केंद्र नसल्याने आणि नेटवर्क नसल्याने शेतकऱ्यांना तालुक्‍यातील वाडा येथील सुविधा केंद्रावर यावे लागत आहे. वाडा येथील महा ई सेवा केंद्रावर या भागातील जवळपास दहा हजारापेक्षा जास्त शेतकरी कर्ज माफीसाठी पात्र असल्याने त्यांच्या सोयीनुसार येथील केंद्रावर ऑनलाईन कर्जमाफी अर्ज भरण्यासाठी येत आहेत. त्यातच ऑनलाईन सेवा नेटवर्क अभावी आणि साईट डाऊन असल्याने मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी ससेहोलपट होत आहे.

जिल्ह्यातील पहिलीच घटना
सध्या कर्जमाफीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी महाईसेवा केंद्रात मोठी गर्दी होत आहे. दिवसभर थांबूनही नंबर लागत नाही. त्यातून सर्व्हर डाऊन असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. यातच नायफड येथील शेतकरी शंकर मारुती ठोकळ या शेतकऱ्याचा महा-ई-सेवा केंद्राबाहेर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. शासनाच्या या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. कर्जमाफीसाठी झटत असतानाच या शेतकऱ्यांची जीवन यात्रा संपली आहे. या घटनेमुळे आता तरी सरकार जागे होईल का, असा प्रश्न समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील पिक कर्ज माफी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतील हा पहिला मृत्यू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)