कर्जफेड आधी की गुंतवणूक? (भाग-२)

कर्ज फेडण्याआधीच आर्थिक उद्दीष्टांसाठी गुंतवणुकीला सुरवात करावी की या गोष्टी एकापाठोपाठ एक कराव्यात?

कर्जफेड आधी की गुंतवणूक? (भाग-१)

सगळ्यात मोठ्या गृहकर्जाचे काय करायचे?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गृहकर्ज हे तुलनेने सगळ्यात स्वस्त असणारे कर्ज आहे आणि तुम्ही करसवलतीचा विचार केला तर व्याजदराच्या दृष्टीने आणखी स्वस्त पडते. पुन्हा घरभाडे मिळणार असेल तसेच घराची किंमत वाढण्याच्या संभाव्य शक्यता लक्षात घेता गृहकर्ज मुदतीआधी फेडण्यापेक्षा चालू ठेवणे श्रेयस्कर ठरते.

कमी व्याजदर आणि करसवलत असणारे कर्ज (गृहकर्ज) मुदतीआधी फेडण्यापेक्षा त्याचे नियमितपणे हप्ते भरत ते ठरलेल्या मुदतीत फेडण्याचा पर्याय स्वीकारावा.

पुन्हा गृहकर्जाचा कालावधी आणि दरमहा हप्त्याची रक्कम याचेही गणित मांडता येते. कमी कालावधी आणि दरमहा हप्त्याची रक्कम मोठी ठेवून लवकर कर्ज फेडता येते किंवा दरमहा हप्त्याची रक्कम कमी करून दीर्घमुदतीचे कर्ज स्वीकारता येते. कर्जाची मुदत दीर्घ ठेवल्यानंतर दरमहा हप्ता कमी होणार असतो. आता ही कमी झालेली रक्कम तुम्ही योग्य अशा म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे गुंतवत राहिलात तर शक्यता अशी असते की पाच ते सात वर्षाच्या कालावधीत तुम्हांला चांगला परतावा मिळू शकतो आणि त्यातून तुम्ही राहिलेले गृहकर्ज फेडू शकता. अशा स्थिती हप्ता वाढवून कमी कालावधीत कर्ज फेडण्याच्या उद्दीष्टांपेक्षाही आणखी कमी कालावधीत तुम्ही सगळे गृहकर्ज फेडू शकता.

कुठल्याही परिस्थितीत गृहकर्ज मुदतीआधी फेडण्याऐवजी गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारणे रास्त ठरते. अर्थात हे सगळे व्यक्तिनुसार असणारी परिस्थिती, जोखिम उचलण्याची ताकद यासगळ्यावर अवलंबून असते आणि म्हणूनच प्रत्येक प्रकरणाचा वेगळा विचार करावा लागतो.

मग काय केले पाहिजे?

1)    ऐनवेळच्या परिस्थितीत सहा महिने घरखर्च चालू शकेल एवढी रक्कम हाताशी ठेवा.

2)    जीवन विमा आणि आरोग्य विम्याचे हप्ते भरले आहेत याची खात्री करा.

3)    तुमच्याकडे पैसे शिल्लक असतील तर पहिल्यांदा क्रेडीट कार्डची थकबाकी भरून टाका.

4)    मग पर्सनल लोन फेडण्याच्या मागे लागा.

5)    गृहकर्जाचे हप्ते नियमितपणे भरा.

6)    शक्य झाल्यास गृहकर्जाच्या हप्त्याची दोन-तीन महिन्यांची आगाऊ रक्कम हाताशी ठेवा.

7)    निवृत्तीनंतरची गरज आणि मुलांचे शिक्षण या महत्त्वाच्या गोष्टींसाठी बचत करा.

8)    यानंतर गृहकर्जाचा हप्ता वाढवायचा किंवा एसआयपीद्वारे इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची याचा निर्णय घ्या.

9)    गृहकर्जाच्या सुरवातीच्या काळात जास्त हप्ते भरले किंवा बोनसची मिळालेली रक्कम कर्जफेडीसाठी भरली तर जास्त फायदेशीर ठरते. कारण त्यावेळी कर्जाची मूळ रक्कम मोठी असते आणि स्वाभाविकपणे त्यावरील वार्षिक व्याजही जास्त असते. त्यामुळे मुद्दलाची रक्कम फारशी कमी होताना दिसत नाही. अशा स्थितीत सुरवातीची काही वर्षे गृहकर्जाची मूळ रक्कम कमी करण्यासाठी जरूर प्रयत्न करावेत.

या सगळ्यानंतरही तुम्हांला डोक्यावर कर्जाचे ओझे नको असेल तर मुदतीआधी कर्ज फेडण्यास काहीच हरकत नाही. अशा स्थितीत कर्जे फेडल्यानंतर तुमचे हप्ते बंद होतात आणि तुमचा पगारही वाढलेला असतो. ही सगळी रक्कम गुंतवणुकीत परावर्तित होईल याची काळजी घ्या. आता दीर्घकालिन उद्दीष्टांसाठी तुम्हांला चांगली गुंतवणूक करण्याची संधी निर्माण झालेली असते.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)