कर्जत-श्रीगोंदे 25 किलोमीटर पाठलागाचा थरार..

दरोड्याच्या तयारीतील टोळी पोलिसांकडून जेरबंद : एक गावठी कट्टा, सहा जिवंत काडतुसे जप्त
खेड – दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांच्या टोळीतील चौघांना जेरबंद करण्यात कर्जत आणि श्रीगोंदे पोलिसांना यश आले. पोलिसांनी जवळपास 25 किलोमीटरचा पाठलाग करून या टोळीला पकडले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, सहा जिवंत काडतुसे आणि एक इनोव्हा गाडी (एमएच 14 इ. बी. 8163) जप्त करण्यात आली.
मिथुन मारुती पालघर, अनिल अंकुश शिंदे, सुनील गजानन खाणेकर, सुनील सुधीर निमसे (सर्व रा. मुळशी, ता. मुळशी, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सविस्तर माहिती अशी की, उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे तसेच कर्जतचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली. दूरगाव तलावाजवळ काही इसम काही गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेले आहेत. पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ पोलीस उपनिरीक्षक शहादेव पालवे, कॉन्स्टेबल सागर जंगम, सुनील खैरे, फिरोज पठाण, अनमोल चन्ने, इरफान शेख यांनी कुळधरण शिवारात धाव घेतली. मात्र, त्यापूर्वीच आरोपी दूरगाव तलाव येथून श्रीगोंद्याच्या दिशेने गेले होते. पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी तत्काळ श्रीगोंदे पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांच्या पथकाने श्रीगोंदे शहरात नाकाबंदी सुरू केली. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी हिरडगाव चौफुला येथे सापळा लावला. भरधाव वेगाने जाणारी ही गाडी हिरडगाव चौफुला येथे अडविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, ते शक्‍य झाले नाही. श्रीगोंदे शहरात असणाऱ्या घोडेगाव चौकात ही इनोव्हा गाडी आली. पोलिसांनी ती थांबविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात गाडीतील चौघांनी गाडी थांबवून रस्त्याच्या बाजूला पळ काढला.
पोलीस पथकाने या चौघांचा सिनेस्टाइल पाठलाग करत त्यांना जेरबंद केले. त्यांची झडती घेतली असता त्यातील एकाकडे गावठी कट्टा व त्यामध्ये सहा राऊंड लोड केलेले आढळून आले. पोलिसांनी गावठी कट्टा, इनोव्हा गाडी आणि चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना कर्जत पोलिसांच्या ताब्यात दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)