कर्जत शहरात एसटी बससाठी झुंबड

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

कर्जत – कर्जत शहरात शिक्षणासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शाळा-महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बसमध्ये बसण्यासाठी विद्यार्थी जीवघेणी लगबग करताना दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

शहर हे इतर तालुक्‍यांच्या दृष्टीने शिक्षणाचे माहेरघर म्हणून समजले जाते. शहरातील शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये उत्तम शिक्षणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे शहरात बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत असतात. त्यामुळे साहजिकच येण्या-जाण्यासाठी एसटी महामंडळावर मोठा ताण पडतो. परंतु, शाळा- विद्यालय सुटल्यानंतर घरी परतताना विद्यार्थी मोठी धावपळ करत असतात. बसमध्ये बसण्यासाठी जीवघेणी लगबग करत आहेत. चालक आणि वाहक यांनी रोखण्याचा प्रयत्न करूनही विद्यार्थी बस प्रवेशद्वारावर जीवघेणा स्टंट करत असतात. अशा स्टंटबाज विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यास नाइलाजास्तव चालक आणि वाहक यांच्याशी हुज्जतही पहावयास मिळते. त्यामुळे किमान पालकवर्ग आणि शाळा व्यवस्थापनाने तरी सुरक्षिततेसाठी आपल्या विद्यार्थ्यांना योग्य ती समज देत भविष्यातील दुर्घटना टाळावी.

एसटी महामंडळ आणि कर्जत बस व्यवस्थापक यांनीही शाळा-महाविद्यालय सुटण्याच्या वेळी काही आगाऊ बस फेऱ्याचे नियोजन करावे अथवा ज्या मार्गावर विद्यार्थी संख्या अधिक असेल त्या मार्गावरील बस वेळेत योग्य ते नियोजन करत विद्यार्थीवर्गाच्या सुरक्षेसाठी हातभार लावत याबाबत उपाययोजना कराव्यात. तसेच, किमान शाळा सुटताना कर्जत बसस्थानक परिसरात एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी; जेणेकरून टार्गट वृत्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांना धाक बसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)