कर्जतला शालेय विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतूक

वाहतुक पोलिसांचा अपुरा धाक ; अवैध वाहतूक फोफावली
कर्जत – किरण जगताप – तालुक्‍यातील विविध भागात मालवाहतूक करणाऱ्या वाहनातूनच चक्क शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. वाहन चालकांना पोलिसांचे कसलेच भय उरले नसल्याने चिमुकले विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करताना दिसत आहे. अपुऱ्या एसटी बसेसमुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असला तरी, अशा खासगी वाहनास अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? हा प्रश्न आहे. पोलिसांकडून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जुजबी कारवाई केली जात असल्याने वाहन चालकांचे अधिक फावले आहे.
कर्जत तालुक्‍यात एसटीच्या अपुऱ्या बसेसमुळे रिक्षा, जीप, टेम्पो अशा वाहनांमधून प्रवाशांची नियमबाह्य वाहतूक केली जात आहे. यामध्ये ‘विद्यार्थी’ हा सर्वाधिक प्रवासी आहे. त्यामुळे असा अवैध प्रवास विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची चिन्हे आहेत. कर्जत शहरात वाहतूक पोलीस काहिसे सक्रिय असल्याने, त्यांचे अशा अवैध वाहतुकीवर नियंत्रण आहे. मात्र ग्रामीण भागात वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच कुठे दिसत नाही. त्यामुळे कुळधरण, कोपर्डी, राशीन, मिरजगाव, कोंभळी, माहीजळगाव आदी भागातील प्रवासी वाहतूक रामभरोसे असल्याचे चित्र आहे.
कर्जत-कुळधरण, खेड-राशीन, सिध्दटेक-राशीन, कर्जत- मिरजगाव आदी रस्त्यांवर ही अवैध वाहतूक सर्वाधिक पहावयास मिळते. वाहतूक पोलीस आणि नियमबाह्य खासगी प्रवासी वाहतूकदारांच संबंध इतके मधूर आहेत की, वाहतूक पोलिसांकडून खासगी वाहन चालकांना कसलाच धोका होणार नाही, अशा अविर्भावात चालक वागतात. मालवाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पोमधून तालुक्‍यातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. टेम्पोतच दोन्ही बाजूला लाकडी फळ्या बसवून, वाहन चालकांनी प्रवाशांची तात्पुरती बैठक व्यवस्था केल्याचे दिसते. वाहनाची मूळ रचना ही माल भरण्याच्या दृष्टीने केलेली असल्याने प्रवाशांना मात्र अधांतरी लटकत बसावे लागते. या कृत्रिम बैठक व्यवस्थेमध्ये प्रवाशांनी वाहनाच्या कोणत्या भागाला पकडावे हा प्रश्न असतो. रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे प्रवाशांना हेलकावे खात, धक्के सहन करीत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. कर्जत-वडगाव तनपुरे, दूरगाव, कुळधरण या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक होते. शनिवारी कर्जतहुन दूरगावच्या दिशेने अशी अनेक वाहने रस्त्यावर धावत होती.

तालुक्‍यातील 35 गावांत बस जात नाही.
तालुक्‍यातील अनेक रस्त्यांवर कित्येक शाळकरी विद्यार्थी टॅक्‍सीला मागे लटकून, वाहनाच्या टपावर बसून प्रवास करताना दिसतात. तालुक्‍यातील 35 गावांत अजूनही एसटी बस जात नाही. अशा गावात खासगी वाहनांचा आधार घेतल्याशिवाय प्रवाशांना पर्याय नाही. नुकतेच मोठ्या दिमाखात अत्याधुनिक बसस्थानकाचे कर्जत येथे उद्घाटन झाले. त्यावेळी नव्याने बसेस सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र त्यातील अनेक एसटी बसेसने परतीचा प्रवास केलाच नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कायम आहे. कर्जतला पुरेशा एसटी बसेस देण्याबाबतच्या मुद्यावर कोणीच बोलताना दिसत नाही. जे बोलतात ते राजकीय उद्देशाने प्रेरित असल्याने मूळ प्रश्न जैसे थेच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर 283 अन्वये कारवाई केली जाते.शहरातील अवैध वाहतुकीवर अधिक कारवाया झालेल्या आहेत. ग्रामीण भागात अवैध वाहतूक करणाऱ्यांवर अधिक लक्ष दिले जाईल.
– सुनील खैरे,
वाहतूक पोलीस, कर्जत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)