कर्जतमध्ये कोट्यावधीची फसवणूक करणारा भोंदूबाबा गजाआड

गुप्नधनाचे अमीष दाखवून करत होता फसवणूक : दौंड पोलिसांची कारवाई
भोंदूबाबा कर्जत पोलिसांच्या ताब्यात, बाळू पवार यांनी दिली फिर्याद
दौंड  – कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्‍यातील गरीब शेतकऱ्यांची गुप्तधनाच्या आमिषाने कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारा भोंदू बाबासह एका रेल्वे कर्मचारी हस्तकाला दौंड पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले आहे. हा गुन्हा कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्‍यात (जि.अहमदनगर) येथे घडल्यामुळे यातील संशयित आरोपींना कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. भोंदू बाबा अब्दुल जावेद अब्दुल समी (वय 48, रा.भोपाळ, राज्य-मध्यप्रदेश) आणि हस्तक भारत मुरारी धिंडोरे (वय 42, रा.रेल्वे वसाहत, ता.दौंड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या प्रकाराबाबत बाळू लक्ष्मण पवार (वय 45, रा. भांडेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भोंदू बाबाने दोन हस्तकांच्या मदतीने वेळोवेळी हातचलाखी करून तुमच्या घरातील आणि तुमच्या शेतातील गुप्त धन काढून देतो, असे लालच दाखवून वेळोवेळी 5, 10, 15, 20, 25 लाख रुपये टप्प्या टप्प्याने घेऊन फसवणूक केली. भोंदू बाबाची फसवणूक करण्याची कार्यशैली – भोंदू बाबा सुरूवातीला एजंटामार्फत पैशाची नड असलेला शेतकरी गाठत असत. सुरूवातीला केवळ अकरा हजार रुपये खर्च करून गुप्त धन आहे की नाही? हे पाहणारी पूजा करावी लागेल, असे सांगून जाळ्यात ओढतात. पूजा केल्यानंतर तुमच्या शेतात धन आहे, खूप मोठे घबाड आहे असे सांगून त्या शेतकऱ्याच्या घराजवळ पाच फुट खोल आयताकृती खड्डा खोदून तो शेणाने लिंपून घेण्यास सांगितले जाते. त्यानंतर अंधार पडल्यानंतर रात्री घरतील सर्व लोकांना घरात पूजेमध्ये गुंतवून ठेवले जात असे. दरम्यानच्या काळात भोंदू बाबाचे हस्तक खड्ड्यामध्ये पाळीव साप आणि फडके बांधलेला हंडा गुपचुप ठेवत असे. त्यानंतर हस्तक मोबाईलवर बाबाला इशारा करत त्यानंतर बाबा त्या शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांना घेऊन त्या खड्ड्याकडे जात असे. बॅटरीच्या उजेडात तो हंडा आणि साप दाखवत असे, नंतर तो भोंदूबाबा दिव्य शक्ती असल्याचे भासवून त्या सापाला पकडुन हंडा ताब्यात घेत असे.
तो साप एका पिशवीत ठेवून हंडा घरात नेऊन पूजेचे नाटक केले जात असे. त्यानंतर त्या हंड्यामधून सोन्याचा तुकडा काढून घरमालकाला खात्रीसाठी देण्यात येत असे. नंतर पंधरा दिवसांनी पूजा करू, असे सांगून जर या हंड्यास कोणी हात लावला. तर, ती व्यक्ती जागीच मरण पावेल अशी भीती दाखवून तो जात असे. पंधरा दिवसांनी त्या शेतकऱ्याला सोन्याच्या तुकड्याची खात्री पटल्याने शेतकऱ्याचा भोंदू बाबा वरचा विश्वास वाढलेला असे. पण, त्यानंतर या हंड्यावर बारा मृत व्यक्तींचे आत्मे आहेत, असे सांगून त्या आत्म्यांच्या शांततेसाठी घरातील एका व्यक्तीचा बळी द्यावा लागेल, असे सांगून भीती दाखवत असे. त्यानंतर यावर उपाय काय? असे विचारातच आत्म्याचा हिस्सा रोख स्वरूपात द्यावा लागेल, असे सांगून 5, 10, 15, 20, 25 लाख रुपये टप्पा टप्प्याने घेऊन पाण्यात सोडल्याचे भासवून हातचलाखी करून ते पैसे हडप केले. नंतर भोंदूबाबा पसार होत असे आणि शेतकऱ्याचा हातात मोकळा हंडा राहत असे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)