कर्करोग रुग्णांच्या निवासासाठी मुंबईत 300 खोल्यांची इमारत – आरोग्यमंत्री

डॉ.दीपक सावंत यांची विधानसभेत माहिती


रुग्णालयात आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणार

मुंबई – परळ येथील टाटा रुग्णालयात कर्करोगाच्या उपचारासाठी येणाऱ्या राज्यभरातील रुग्णांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्यभरातून येणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबियांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून गोवंडी येथील इमारतींमधील 300 खोल्यांमध्ये निवास व्यवस्था केली जाणार आहे. हा विषय नगरविकास विभागाकडे असून मुख्यमंत्री त्याला मान्यता देणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत दिली.

कोल्हापूरमधील शिरोळा येथील आमदार उल्हास पाटील यांनी लक्षवेधीद्वारे शिरोळा येथे कर्करुग्णांची संख्या वाढत असून या रुग्णांसाठी विशेष रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली. याला उत्तर देताना डॉ. दीपक सावंत यांनी शिरोळा तालुक्‍यातील रुग्णांची टाटा कॅन्सर रजिस्ट्रीच्या माध्यमातून नोंद केली जाईल. त्याचप्रमाणे संपूर्ण कोल्हापूरमधील रुग्णांचीही माहितीही याच माध्यमातून घेतली जाईल. त्यानुसार येथील कर्करोग रुग्णांसाठी उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले.

यावेळी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या निवासाबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपणही याबाबत प्रयत्नशील असल्याचे सांगून कर्करोग रुग्णांसाठी गोवंडी येथे निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेणार आहेत. या ठिकाणी कर्करोग रुग्णांना राहण्यासोबत केमोमुळे होणारे कॉम्प्लिकेशन रोखण्यासाठी डॉक्‍टरची नेमणूकही करण्यात येईल. त्याचप्रमाणे या रुग्णांना टाटा रुग्णालयात नेण्या-आणण्यासाठी वाहतूक व्यवस्थाही करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री म्हणाले.

मुंबईसारख्या शहरात ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्णांची संख्या वाढत आहे. टाटा रुग्णालयात यासाठीची तपासणी करण्यासाठी लांबच लांब रांगा असतात. यामुळे बहुतांशी महिला तपासणी न करताच परतात. त्यामुळे ही व्यवस्था सरकारने खासगी रुग्णालयांत उपलब्ध करून द्यावी. तेथील उपचारांचा खर्च सरकारने उचलावा. अशा आजारांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी अशी मागणी अजय चौधरी यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)