करिअर समुपदेशक बनायचंय? 

वनिता कापसे 

आजकाल करियरसाठी असंख्य वाटा निर्माण झाल्या आहेत. मेडिकल किंवा इंजिनिअरिंग म्हणजे करियर ही संकल्पना आता कालबाह्य झाली आहे. अशा स्थितीत युवक-युवतींना आपण कोणत्या मार्गाची निवड करावी, यावरून गोंधळात सापडलेले असतात. करियर मार्गदर्शन केंद्र, वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांवरून करियरविषयक प्रसारित होणारे मार्गदर्शन, तज्ञांचे मार्गदर्शन शिबिरला हजेरी लावून विद्यार्थी करियरबाबत एका निश्‍चित निर्णयाप्रत येतात. जर आपणही अन्य मंडळींना करियरबाबत मार्गदर्शन किंवा सल्ला देत असू तर हाच सल्ला किंवा मार्गदर्शन तंत्राला आपले करियर बनवू शकतो.

आपण कळत नकळतपणे अनेकांना विविध फिल्डची, क्षेत्राची माहिती देत असतो. संकेतस्थळ, वर्तमानपत्र , मित्र-मैत्रिणीच्या माध्यमातून आपल्याला करियर क्षेत्राची माहिती मिळवत असतो आणि तीच माहिती आपण सल्ल्याच्या रुपाने पुढे देत असतो. जर आपण याच सवयीला किंवा छंदाला करियरचे रुप दिले तर आपण उत्तम करियर मार्गदर्शक किंवा समुपदेशक होऊ शकतो. विविध वयोगटातील मुला-मुलींना योग्य तरंहेने करियरविषयक मार्गदर्शन करण्याची हातोटी आपल्या अंगी असेल तर याच क्षेत्रात आपले भविष्य पुढे नेण्याचा विचार करावा.

आपल्याला करियर कौन्सिलिंग करण्याची आवड असेल तर बारावीनंतर मानसशास्त्र, सामाजिक कार्य विषयांसह पदवी प्राप्त करावी. त्यानंतर महाविद्यालय, विद्यापीठातून कौन्सिलिंग, लाइफ स्किल एज्युकेशन किंवा मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवावी. पदवी मिळवल्यानंतर उमेदवार कौन्सिलिंगमध्ये डिप्लोमाला प्रवेश घेऊ शकतो. परंतु काही संस्था डिप्लोमा प्रवेशासाठी मानसशास्त्र पदवीची अट ठेवतात. या अभ्यासक्रमाचा कालावधी साधारणत: एक ते दोन वर्षाचा आहे. ज्यांनी मानसशास्त्रात पदवी मिळवली आहे, अशा विद्यार्थ्यांना पीजी डिप्लोमाचा पर्याय उपलब्ध असतो. याशिवाय कौन्सिलिंग आणि मार्गदर्शन अभ्यासक्रमाचे देखील पर्याय उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम अर्धवेळ तत्त्वावर देखील पूर्ण करता येतात.

करियर कौन्सिलर हा करियरबाबतच्या दृष्टीकोनात स्पष्टता आणण्याचे काम करत असतो. काही करियर कौन्सिलर महिना किंवा दोन महिन्यांचा कोर्स तयार करतात. या कोर्समधून किंवा अभ्यासातून विद्यार्थ्यांचा कल कोणत्या विषयाकडे किंवा क्षेत्राकडे आहे, हे ठरवले जाते. विद्यार्थ्याची गरज किंवा क्षमतेला साजेसा असणारे फिल्ड सांगण्याचे काम करियर कौन्सिलर करत असतो. एखाद्या विद्यार्थ्याला जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी संबंधित क्षेत्र कसे उपयुक्त आहे आणि ते मिळवण्यासाठी कोणते कौशल्य आवश्‍यक आहे, हे सांगण्याचे काम देखील करियर कौन्सिलर करत असतो.

भारतीय पालकांना करियरच्या बदलत्या ट्रेंडची माहिती अजूनही फारशी झालेली नाही. तसेच निवडलेले करियर जॉबसाठी किती पुरक आहे किंवा नाही, याबाबतही ते ठामपणे मत व्यक्त करू शकत नाहीत. अशा वेळी एखाद्या विद्यार्थ्यांला हट के करियर निवडण्याची इच्छा असते आणि तो त्यादृष्टीने प्रयत्नही करत असतो. परंतु त्याचे पालक पारंपारिक करियरला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या पाल्याने संधी गमावू नये, असे सर्वच पालकांना वाटत असते. मात्र मुलाच्या मनात करियरबाबत वेगळ्याच संकल्पना विकसित झालेल्या असतात. नवीन मार्ग, नव्या कल्पनेच्या जोरावर विद्यार्थी करियर करण्याची मनिषा बाळगून असतो. अशी स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा करियर कौन्सिलर हा मुलगा आणि पालक यांच्यातील मध्यस्थाची भूमिका बजावतो. दोघांनाही करियरच्या संकल्पना स्पष्ट करून सांगतो. आपल्या समुपदेशनातून पालक आणि पाल्य यांचे समाधान करण्याची शैली करियर समुपदेशकाच्या अंगी असणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)