कराड शहर, तालुक्‍यात कडकडीत बंद

मुंडण, भजन अन्‌ जनावरांसह रास्ता रोको
कराड,  (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणासाठी कराड शहर आणि तालुक्‍यात गुरूवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान ठिकठिकाणी रस्त्यात अडथळे निर्माण करून रास्ता रोको करण्यात आला. कराड येथील प्रीतिसंगमावर नागरिकांनी सामुहिक मुंडण केले. सैदापूर कॅनॉल येथे जमावाने दोन तास रस्ता रोखून धरला, तर ओगलेवाडी येथे आंदोलक जनावरांसह रस्त्यावर उतरले. रस्त्यावर टायर पेटविले. महामार्गावर उंब्रज ते कराड दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलकांनी वाहने रोखली. कराडच्या कोल्हापूर नाक्‍यावर ठिय्या मारून आंदोलकांनी महामार्ग रोखला. तासवडे टोलनाक्‍यावर आंदोलकांनी सकाळी दोन तास ठिय्या मारून भजन केले. ग्रामीण भागातही सर्व व्यवहार बंद राहिले. कराड विमानतळाबाहेरील रस्त्यावर दुभाजकाचे दगड टाकून वाहतुकीला अडथळे आणले. कराडात मराठा बांधवांनी घोषणाबाजीत रॅली काढली.
मराठा आरक्षणावर तातडीने तोडगा काढण्यात यावा, यासाठी कराड येथील दत्त चौकातील छ. शिवाजी महाराजांच्या अश्‍वरूढ पुतळ्यासमोर महिलांनी आठवडाभर ठिय्या आंदोलन केले. बंदच्या आदल्या दिवशी ते आंदोलन स्थगित करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी (गुरूवारी) बंद असल्याने सकल मराठा बांधव, भगिनींनी कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गुरूवारी शहर आणि तालुक्‍यातील सर्व व्यवहार बंद राहिले. मराठा बांधवांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. शहर आणि परिसरात मोटरसायकल रॅली काढली. येथील प्रीतिसंगमावर नागरिकांनी सामुहिक मुंडण केले. त्यानंतर सैदापूर कॅनॉल येथे शेकडोंच्या जमावाने रस्त्यात ठिय्या मारत विजापूर-चिपळूण राष्ट्रीय महामार्ग रोखला. ओगलेवाडी येथे याच मार्गावर काट्याचे पिंजर टाकून आणि रस्त्यात टायर पेटवून उग्र आंदोलन करण्यात आले. शेळ्या, मेंढ्या, म्हैशी, गाईंसह आंदोलक रस्त्यावर उतरले. यामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली.
शहरातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याचे प्रशासनाने आवाहन केले होते. तसेच बाटलीतून कोणालाही पेट्रोल न देण्यास बजावले होते. त्यामुळे चालकांनी पंप बंद ठेऊन प्रशासनाला सहकार्य केले. कराड आगाराने एस. टी.च्या सर्व फेऱ्या रद्द केल्या. तसेच शहर रिक्षा आणि ग्रामीण भागातील वडापही बंद राहिले. परिणामी शहरातील गजबज असणारे परिसर ओस पडले होते. मेडिकलची दुकाने आणि हॉस्पीटल्स वगळता सर्व व्यवहार बंद होते. शासकीय कार्यालयेही बंद होती. आंदोलकही दिवसभर कराड ते मलकापूर आणि मलकापूर ते कराड, अशी रॅली काढत होते. एक मराठा, लाख मराठा, कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय, अशा घोषणा देत आंदोलकांनी कराडसह परिसर दुमदुमून सोडला.
उंब्रज-कराड या दरम्यान तासवडे, वहागाव, खोडशी, वनवासमाची येथे महामार्गावर उतरून आंदोलकांनी वाहने अडविली. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांनी महामार्गावरून बाजूला नेले. कराड-पाटण मार्गावर वसंतगड, सुपने येथे युवक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून वाहने अडवित होते. वारूंजी फाटा येथेही आंदोलकांचा जमाव होता. मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला कराड शहर आणि तालुक्‍यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तसेच किरकोळ प्रकार वगळता कोणतेही गालबोट न लागता बंद यशस्वी झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)