कराड विमानतळाचे विस्तारीकरण निधीच्या प्रतिक्षेत

उमेश सुतार

वर्षभरात तब्बल 70 हेलिकॉप्टरसह विमानांचे लॅडिंग

कराड – पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणाऱ्या तसेच सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण ठरलेले एकमेव मोठे विमानतळ म्हणून कराड विमानतळाचा नावलौकिक आहे. याठिकाणी व्हीआयपींची वाढती वर्दळ लक्षात घेता या विमानतळावर हेलिकॉप्टर व विमानांची गर्दी होत असते. याचा विचार करता कराड विमानतळाचे विस्तारीकरण होणे गरजेचेच आहे. विस्तारीकरणाचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविल्याचे बोलले जात असले तरी याला मूर्हुत कधी सापडणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सद्यस्थितीत विमानतळ विस्तारीकरणाचा प्रस्ताव शासन दरबारी निधीच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते स्व. यशवंतराव चव्हाणसाहेबांनी मुख्यमंत्री असताना सन 1962 मध्ये सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव विमानतळाची कराड येथे उभारणी केली. तेव्हापासून आजपर्यंत या विमानतळाचा वापर सुरु आहे. मात्र, विमानतळावर ज्या सुविधा असाव्यात, त्यातील एकही अत्याधुनिक सुविधा याठिकाणी नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. कराड हे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे ठिकाण असल्याने कोल्हापूरहून पुणे, मुंबईला जाणारी अथवा मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी प्रत्येक व्हीआयपी व्यक्ती कराड विमानतळावर येतच असते. या विमानतळावर विमानांसह हेलिकॉप्टर उतरण्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे या विमानतळावर सातत्याने व्हीआयपींची वर्दळ असल्याचे चित्र दिसून येते.

कराड येथील विमानतळावर पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणातून येणाऱ्या व्हीआयपींची सुध्दा संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या विमानतळाचे विस्तारीकरण झाल्यास याठिकाणी आर्थिक सुबत्ता निर्माण होवून भविष्यात हवाई वाहतूकही सुरु होण्यास मदत होईल, हा दूरदृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना कराड विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा हाती घेतला होता. त्यासाठी लागणारी जमीन घेऊन शासनाकडून त्यांना भरपाई देण्यासाठीची कार्यवाही करण्यात येणार होती. मात्र, त्याला जमीन देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला. यावेळी विमानतळ विस्तारीकरणासाठी नेमकी किती जमीन लागणार, याबाबतचा सर्व्हे करण्यासाठी जमिनीची मोजणी करण्यात आली होती. या विस्तारीकरणासाठी ज्या लोकांच्या जमिनी संपादित होणार आहेत. त्यांना द्यावयाच्या आर्थिक भरपाई रक्कमेबाबत तसेच इतर काही सोयी-सुविधांबाबतचा प्रस्ताव तयार करुन तो शासन दरबारी सादर करण्यात आला होता. यावेळी दरम्यानच्या काळात शेतकरी व प्रशासन, अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी सकारात्मक विचार होवून शासन पातळीवर जमीन हस्तांतरणासाठीची तांत्रिक कार्यवाही पूर्ण करण्यात आली. मात्र, नेमके या काळात सरकार बदलले आणि विमानतळ विस्तारीकरणाचा प्रस्ताव लोंबकळत पडला. हा गेली चार वर्षे तसाच प्रलंबित राहिला आहे. त्यासाठी आता निधीची प्रतीक्षा आहे. कराड हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आणि कोकणासह सांगली जिल्ह्यात जाण्यासाठी व्हीआयपी येथील विमानतळावर येत असल्याने त्याचा सातत्याने वापर होत आहे.
काही दिवसांपूर्वी माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांचा ताफा याठिकाणी आला होता. यावेळी आलेली विमाने तसेच हेलिकॉप्टरची गर्दी विमानतळावर झाली होती. येथील विमानतळावर होणारी गर्दी विचारात घेवून यावेळी सोनहिरा साखर कारखाना परिसरात पाच हेलिकॉप्टर उतरण्याची व्यवस्था करण्याची वेळ आली होती. त्यामुळे कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एखदा अधोरेखित झाला आहे. सातत्याने वाढणाऱ्या लॅंडिंगचा विचार करता कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाची खरोखरच नितांत गरज असल्याचे दिसून येत आहे. यादृष्टीने लोकप्रतिनिधींनी पाउले उचलून शासन दरबारी याबाबत सकारात्मक निर्णय घेवून कराड विमानतळ विस्तारीकरणाचा रेंगाळत पडलेला प्रश्न मार्गी लावावा. अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. कराड विमानळावर वर्षात सुमारे 20 ते 30 विमाने व हेलिकॉप्टरची लॅंडिंग होत होती. मात्र यंदा तब्बल 70 हेलिकॉप्टर आणि विमानांची लॅंडिंग झाल्याची नोंद झाली आहे. विमानतळ विस्तारीकरण करत असताना याठिकाणी धावपट्टीचे विस्तारीकरणासह इतर आधुनिक सोयी-सुविधा निर्माण केल्यास भविष्यातील विमान व हेलिकॉप्टरची लॅंडिंगची संख्या आणखी वाढेल, अशी माहिती विमानतळ व्यवस्थापक कृणाल देसाई यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)