कराड बसस्थानकाच्या उद्घाटनाला अखेर हिरवा कंदिल

कराड ः बसस्थानकाला रंगरंगोटी देण्याचे सुरू असलेले काम.

सोमवारी मान्यवरांच्या हस्ते होणार लोकार्पण

कराड, दि. 4 (प्रतिनिधी) – गेली अनेक दिवस चर्चेत असणार्‍या कराड बसस्थानकाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा सोमवार, दि. 7 रोजी होणार आहे. या बसस्थानकाच्या माध्यमातून अद्ययावत सोयींनीयुक्त असे नवीन बसस्थानक आता प्रवाशांच्या सेवेस सज्ज राहणार आहे. दि. 7 रोजी परिवहनमंत्री सुधाकर रावते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षामध्ये विशेष बाब म्हणून कराड एस. टी. बसस्थानकाच्या नुतनीकरणाचा निर्णय घेवून त्यासाठी 11 कोटी रुपये मंजूर केले होते. 2013 मध्ये इमारतीसाठी निधी मंजूर झाला मात्र प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला नाही. त्यानंतर बसस्थानकात स्टॉलधारकांना जागा न मिळाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने नुतनीकरणाच्या कामास स्थगिती देण्यात आली होती. स्थगिती उठल्यानंतर गेले वर्षभरापासून काम सुरु आहे.
गत चार वर्षांमध्ये प्रवाशांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. अधिकारी व कर्मचार्‍यांनीही अनेकप्रकारे तडजोड करीत काम केले. पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी आगार व्यवस्थापनाकडून नूतन इमारतीवर शेड टाकून ते वापरण्यास सुरुवात करण्यात आली. तर पावसाळ्याच्या शेवटी तेथील काँक्रीटीकरणाचे कामही झाल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या तेथूनच सोडण्यात येवू लागल्या. मात्र तेथे बाकडे व इतर साहित्य नसल्याने प्रवाशांना एस. टी. ची वाट बघत उभे रहावे लागत होते. मध्यंतरी परिवहन मंत्री सुधाकर रावते यांनीही बसस्थानकाच्या कामाची पाहणी करुन जानेवारी 2019 मध्ये इमारतीचे उद्घाटन करण्याबाबत सूचना केल्या होत्या.
गत दोन महिन्यात जलदगतीने बसस्थानकाचे काम उरकण्यात आले आहे. अतिशय भव्य असणार्‍या या इमारतीमध्ये प्रवाशांना वेटिंग करण्यासाठीची सुविधा करण्यात आली आहे. प्रशस्त प्रवेश हॉल, भव्य चौकशी कक्ष, रिझर्व्हेशनसाठी स्वतंत्र सोय, हिरकणी कक्ष, 22 प्लॅटफॉर्म, बँक, वाहक-चालकांसाठी रेस्टरूम, 11 गाळे आदीची सोय करण्यात आली आहे. बसस्थानकाची ही भव्य इमारत कराडच्या वैभवात भर टाकणारी आहे. सुमारे 11 कोटी रुपये खर्च करुन ही इमारत बांधण्यात आली आहे. एकूण 32 हजार 380 स्क्वेअर फूट जागेत बांधलेले व 13 हजार 560 स्क्वे. फूट जागेत प्रवाशांसाठी वेटिंग रूम अशी भव्य बसस्थानकाची इमारत असून त्यामध्ये प्रवाशांसाठी अद्ययावत सुविधा करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी बसस्थानकाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण होत असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)