कराड-पाटण तालुक्‍यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कराड – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने नगरपालिकेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी येथील बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन केले.  नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेविका विद्या पावसकर, अंजली कुंभार, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी अभिवादन केले. नगरअभियंता एम. एच. पाटील, प्रशासन अधिकारी एस. जी. गोसावी, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनीही अभिवादन केले. तसेच भिमशक्‍ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, युवराज काटरे, माजी प्राचार्य खोब्रागडे, किशोर आठवले व नागरिक उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण विद्यालय, यशवंतनगर
यशवंतराव चव्हाण विद्यालय यशवंतनगर ता. कराड येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक ए. आर. अर्जुगडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात आला. कार्यक्रमास मुख्याध्यापक एस. आर. कदम, पर्यवेक्षक एस. बी. जाधव उपस्थित होते.

सह्याद्री वाचनालय, मल्हारपेठ

काळगाव, (वार्ताहर) -येथील सह्याद्री वाचनालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा व प्रगल्भ विचार यांचा आदर्श समाजाने घ्यावा व वाचन चळवळ अधित गतिमान करावी, असे प्रतिपादन सह्याद्रि वाचनालयाचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम माने, सुभाष पानस्कर, बजरंग माने, धनंजय सगरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले आहे. ग्रंथापल शुभांगी पवार, सुजाता चव्हाण यांनी स्वागत केले. रूपाली शेटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. उदय वनारसे, दादासाहेब पवार, प्रदीप देसाई उपस्थित होते. वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा व कार्य याविषयीच्या ग्रंथाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

उंब्रज येथे महामानवास अभिवादन

उंब्रज, (वार्ताहर) -छत्रपती शिवाजी महाराज यांनी जात बघून कुणाला सैन्यात घेतले नाही, तर मावळा म्हणूनच घेतले. पण आज र्दुदैवाने सगळीकडे जातीचे राजकारण केले जात असून हा देश पुढे घेऊन जायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे मत विजय मांडके यांनी व्यक्त केले.

-Ads-

उंब्रज, ता. कराड येथील भगतसिंग प्रतिष्ठान व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वतीने येथील बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉ. ऍड. सयाजीराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते किरण माने, कॉ. प्रकाश जंगम, विजय मांडके, उत्तमराव कांबळे, बापूसो बैले, संतोष किरत, भगतसिंग प्रतिष्ठानचे दिपक जाधव, सुरेशराव साळुंखे उपस्थित होते.प्रारंभी महामानवांना अभिवादन करुन सातारा येथील विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील युवक, युवतींनी एकलव्य शिक्षण पद्धती हे पथनाट्य सादर केले.

लेखक किरण माने म्हणाले, आज पुरोगामी विचारांनी लढणाऱ्या लोकांच्यावर दुष्टचक्र येत आहे. समाजात एकलव्याचा अंगठा तोडून मागणाऱ्या प्रवृत्तीचे लोक आजही पहावयास मिळत आहेत. देशाचे पंतप्रधान सोडणार नाही ची भाषा बोलत आहेत. ही देशासाठी धोक्‍याची घंटा आहे. याच्या विरोधात बोलणाऱ्याला देशद्रोही ठरवतात. खोटी आश्वासने देऊन जनतेला भूलवत ठेवले. आता देण्यासारखे काही नसल्याने राम मंदिर, भव्य पुतळे, स्मारकाची अमिषे दाखवली जात असून यांना वेळीच रोखल पाहिजे, असेही परखड मत माने यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी कॉ. प्रकाश जंगम, ऍड. सयाजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आभार उत्तम कांबळे यांनी मानले.

वराडे येथे आंबेडकर यांना अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाज घडवण्यासाठी संघटीत होवून सर्वांनी काम करणे ही काळाची गरज आहे. आजच्या तरुणांनी शिक्षण घेवून स्वत:च्या व समाजाच्या विकासासाठी कार्यरत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी सरपंच आंनदराव साळुंखे यांनी केले. वराडे, ता. कराड येथील संवाद प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सुगंधा जाधव, उपसरपंच रवींद्र घाडगे, माजी सरपंच आनंदराव साळुंखे, ग्रामसेवक सदाशिव खांडके, पोलीस पाटील सुदाम शिरसट, सिद्धांत शिरसाट, भरत शिरसट, नितिश शिरसट, संदिप शिरसट, दिलीप शिरसट, नानासो शिरसट, स्वप्नील सावंत, आनंदराव जाधव, ग्रामस्थ उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)