कराड पाटणला वळीव पावसाचे रंगपंचमीलाच शिंपणे

वादळी वाऱ्याने पडझड होऊन शेतकऱ्यांचे नुकसान

कराड – कराड व पाटण तालुक्‍याच्या काही भागात सोमवारी रंगपंचमीला वळीव पावसाने हजेरी लावत दोन्ही तालुक्‍यांच्या विविध भागात शिंपणे केले. या पावसाने ठिकठिकाणी काही प्रमाणात हजेरी लावल्याने हवेतील उष्मा कमी झाला आहे. मात्र काही भागात उन्हाच्या तिव्रतेत कमालीची वाढ झाल्याने जनमाणसांचा जीव अक्षरश: कासाविस झाला आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यांमुळे शिवारातील आंब्यांचा मोहर झडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम आंबा उत्पादनावर होण्याची भीती शेतकरी वर्गामधून व्यक्त केली जात आहे. अचानक आलेल्या या वळीवाचा विंग व उंब्रज येथील आठवडा बाजाराला चांगलाच फटका बसला.

कराड तालुक्‍यातील विंग, उंडाळे, सवादे, उंब्रज या परिसरात सकाळपासूनच वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली होती. उष्णतेने अंगाची लाहीलाही होत असताना अचानक दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह तसेच जोरदार वाऱ्यासह वळीव पावसाने हजेरी लावली. सोमवारी उंब्रज, विंग येथे आठवडा बाजार भरला होता. अचानकपणे वळीवाचे आगमन झाल्याने बाजारकरुंची चांगलीच पळापळ झाली. विंगला पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या असल्या तरी या पावसाने बाजारात विक्रेत्यांची तारांबळ उडाली. उंडाळे परिसरातही सायंकाळच्या सुमारास वादळी पावसाचे जोरदार आगमन झाले. या पावसामुळे रब्बी हंगामातील गव्हू, शाळू पिकांची काढणी व मळणीची कामे खोळंबली. तर काही ठिकाणच्या ऊसतोडीही बंद झाल्या. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला.

पाटण तालुक्‍यातील चाफळ, मल्हारपेठ, तळमावले या परिसरात प्रचंड वाऱ्यासह वळीव पावसाचे आगमन झाले. गेल्या काही दिवसापासून वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. मात्र सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रंगपंचमीलाच वळीव पावसाने हजेरी लावल्याने बालचमुंनी रंगासह पावसाचा आनंद लुटला. या पावसामुळे शिवारात गव्हाच्या काढणीत मग्न असलेल्या बळीराजाची धांदल उडाली. काढणीची कामे अंतीम टप्प्यात आलेली असून गव्हाच्या पेंढ्या शिवारात वाळण्यासाठी पसरुन ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र वळीवाच्या आगमनामुळे त्या भिजून शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. चाफळसह परिसरातही वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या वळीव पावसाने सर्वांचीच धांदल उडवून दिली. त्याचबरोबर तळमावले विभागात पावसाने काही प्रमाणात हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)