कराड नगरीच्या पाऊलखुणा

पुरातन काळात कराडचा उल्लेख करहाटक नगरी असल्याचा पुरावा अनेक ऐतिहासिक, पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतो. अगदी रामायण, महाभारत काळापासून शिलाहार, भोज ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतचा दैदीप्यमान इतिहास या नगरीला लाभला आहे. त्यामध्ये पौराणिक, धार्मिक महात्मांबरोबरच ऐतिहासिक दृष्टीने कराडला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येते. या शौर्यशाली इतिहासाच्या पाऊल खुणा पावलो पावली विखुरल्या असून त्या आजही ताज्या आणि तितक्‍याच बोलक्‍या आहेत.

राजेंद्र मोहिते

कृष्णा आणि कोयनेच्या पवित्र, ऐतिहासिक, पुण्याभुमीने अनेक रत्ने जन्माला घातली आहेत. त्यामध्ये ऐतिहासिक क्षेत्रास संत, साहित्य, कलेपासून आत्तापर्यंतच्या शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक ते अगदी राजकारणापर्यंतच्या व्यक्तिमत्वांचा त्यामध्ये समावेश होतो. त्यातील हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासह कराड प्रांतातील येसाजी कंक आणि सूर्याजी कंकांच्या वसा आणि वारशाने कराडकरांची छाती अभिमानाने फुगून अगदी वसंतगडाच्या बुरुजा एवढी होते.

धार्मिकतेच्या दृष्टीने रामायणात डोकावताना प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि बंधू लक्ष्मण वनवासात असताना त्यांचा वावर या शहरासह परिसरात राहिला असल्याच्या अख्यायिका सांगितल्या जातात. त्याला वसंतगडावर असलेल्या चंद्रसेन महाराजांच्या मंदिरामुळे उजाळा मिळतो. हे चंद्रसेन महाराज लंकापती रावणाची भगिनी शृर्पनकेचा मुलगा होय. गडावरील वनराईत तपश्‍चर्या करीत असताना लक्ष्मणाकडील खड्‌ग शस्त्र लागल्याने चंद्रसेनचे दोन्ही हात कोपरापासून तुटले. त्यानंतर लक्ष्मणाने चंद्रसेनला कुलदैवत म्हणून तुझी पुजा केली जाईल असा वर दिला. त्यानुसार गडाच्या आसपासच्या काही गावांचे कुलदैवत म्हणून चंद्रसेन महाराजांची आजही तितक्‍याच भक्तीभावाने पूजा अर्चा केली जाते. मंदिरात सध्या असलेल्या मूर्तीच्या मुखवटा पाठीमागे असलेल्या पुरातन मुर्तीचे दोन्ही हात तुटलेल्या अवस्थेत दाखवले असून ते आजही पहायला मिळत असल्यामुळे या अख्यायिकेला दुजोरा मिळतो.

राजाभोज, शिलाहार, सात वाहन आणि आदिलशाही कालखंडातीलही ऐतिहासिक वास्तूंची शहर व परिसरात रेलचेल आहे. या उत्तरा लक्ष्मीमंदिर, घुमूट श्री पावकेश्‍वर मंदिर, पंताच्या कोटातील नकट्या रावळ्याची विहीर, आदिलशाहीची साक्ष देणारे उंचच उंच मनोरे, गोळेश्‍वरची मोटेची बार व या आणि अशा अनेक वास्तूंचा त्यामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद गोष्ट म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलीही कराडनगरी महाराजांच्या स्वराज्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. शिवाय इतिहासातील अनेक रत्नांना जन्म देणारी शौर्यशाली भूमी म्हणूनही महाराष्ट्रात कराडची ओळख आहे. तालुक्‍यात एकूण पाच गडकोट आहेत. त्यामध्ये किल्ले वसंतगड, सदाशिवगड, आगाशिवगड, पंताचाकोट (कराडचा भुईकोट) आणि मसूरचा कोट्यांचा समावेश होतो. तसेच तालुक्‍याच्या सीमेवर किल्ले मच्छिंद्रगड असून पूर्वी कराड प्रांतातील स्वराज्याचा एक महत्वपूर्ण पहारेकरी म्हणून त्याची ओळख होती. त्यातील मसूरचा कोट पूर्णपणे नामशेष झाला असला तरीही इतर गडकोट मात्र आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा आजही उराशी कवटाळून असल्याचे दिसून येते. त्यातील सदाशिवगड आणि आगाशिवगडाची वर्णी टेहळणीच्या किल्ल्यामध्ये लावल्याचे दिसून येते. मात्र सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या तळबीड गावातील सह्याद्री पर्वत रांगेतील उपरांगेमध्ये आजही डौलात उभा असलेला तालुक्‍यातील पहिल्या क्रमांकाचा तर स्वराज्याची दुसऱ्या रांगेतील महत्त्वाचा किल्ला म्हणून किल्ले वसंतगडाची ख्याती आहे.

शिवाय तालुक्‍यातील जखिणवाडी येथील आगाशिवगडाच्या पोटात बौद्धभिक्षूनीं कोरलेल्या बौद्धकालीन लेण्या देखील कराडच्या ऐतिहासिक महात्म्याची साक्ष इतिहासाच्या पाना पानावर, पावला पावलावर कोरत उभी आहेत. त्यामुळे कराड शहर आणि परिसराचा ऐतिहासिक वसा आणि वारसा पुढे येणाऱ्या पिढ्यांपिढ्यासाठी जतन करून त्यामध्ये अधिकाधिक पराक्रमांची भर घालण्याची आज गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी अशा ऐतिहासिक, धार्मिक, शौर्यशाली, गौरवशाली रत्नांची परंपरा पुढे नेण्यासाठी अविरत… अविश्रांत झटत राहण्याची.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)