कराड तालुक्‍यावर 28.25 कोटी रुपयांच्या निधीचा वर्षाव

नामदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांना यश; रस्त्यांचे जाळे होणार मजबूत

कराड, दि. 5 (प्रतिनिधी) – कराड तालुक्‍यातील 15 रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर राज्यशासनाने आता लगेचच यापैकी 10 मार्गांवरील रस्त्यांच्या नुतनीकरणासाठी तब्बल 28 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये कराड दक्षिणमधील आठ मार्गांचा समावेश असून त्यासाठी 23 कोटी 95 लाख रुपये तर कराड उत्तरमधील दोन रस्त्यांसाठी 4 कोटी 30 लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. याबाबतचा शासन आदेश मंगळवारी (दि. 4) काढण्यात आला आहे. श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या रस्त्यांना तातडीने भरघोस निधी मंजूर केल्याने कराड तालुक्‍यातील रस्त्यांचे जाळे मजबूत होण्यास मदत होणार आहे.
कराड तालुक्‍यातील अनेक महत्वाच्या व लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावांमधील रस्ते इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग स्वरुपाचे होते. त्यामुळे त्यांची डागडुजी जिल्हा परिषदेमार्फत होत होती. पण या रस्त्यांचा मोठा आवाका पाहता यावर मोठा निधी टाकणे जिल्हा परिषदेला शक्‍य नसल्याने या रस्त्यांमागचे शुक्‍लकाष्ठ काही केल्या संपत नव्हते. ही बाब लक्षात आल्यानंतर या रस्त्यांचा समावेश प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत व्हावा, यासाठी ना. डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. ना. डॉ. भोसले यांच्या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने कराड तालुक्‍यातील 220.670 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश प्रमुख जिल्हा मार्गात करण्याचा निर्णय घेतला. या 15 रस्त्यांना दर्जोन्नती मिळून महिना व्हायच्या आतच सार्वजनिक बांधकाम खात्याने 15 पैकी 10 रस्त्यांच्या नुतनीकरण व मजबुतीकरणासाठी तब्बल 28.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये कराड दक्षिणमधील 8 रस्त्यांसाठी 23.95 कोटी रुपये तर कराड उत्तरमधील दोन रस्त्यांसाठी 4.30 कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या शासन आदेशान्वये कराड दक्षिणमधील रेठरे बुद्रुक ते इंजिन पाणंद रस्ता (2.80 कोटी), राज्य महामार्ग 4 ते कोयना वसाहत-जखिणवाडी (2.50 कोटी), राज्य महामार्ग 4 ते आटके आणि रेठरे बुद्रुक ते डंगारे वस्ती (2.45 कोटी), कार्वे ते धानाईनगर आणि गोपाळनगर पाझर तलाव ते देसाई वस्ती (2.80 कोटी), कार्वे नाका ते गोळेश्वर (2.10 कोटी), बेलवडे ते मालखेड (1.50 कोटी), कृष्णा नाका ते कोरेगाव (7 कोटी), कालवडे ते नांदगाव (2.80 कोटी) या रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार आहे. तर कराड उत्तरमधील इंदोली ते भांबे ते कोरीवळे (1.80 कोटी) आणि पेर्ले फाटा ते मसूर रेल्वेफाटक (2.50 कोटी) या रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार आहे.

 

ना. चरेगावकर यांच्यामुळे उत्तरेत 4.30 कोटींचा निधी

महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष नामदार शेखर चरेगावकर यांनी कराड उत्तर मतदारसंघातील दोन रस्त्यांना निधी मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार इंदोली ते भांबे ते कोरीवळे (1.80 कोटी) आणि पेर्ले फाटा ते मसूर रेल्वेफाटक (2.50 कोटी) या रस्त्यांसाठी एकूण 4.30 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार आहे.

 

कराड दक्षिणवर राज्य सरकारची मेहेरनजर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची कराड दक्षिण मतदारसंघावर विशेष मेहेरनजर असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नामदार डॉ. अतुल भोसले व नामदार शेखर चरेगावकर यांच्या प्रयत्नामुळे राज्यसरकारने दिवाळीच्या काळातच कराडमधील 100 फुटी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून शेकडो मिळकतधारकांना दिवाळी भेट प्रदान केली. त्यानंतर गेल्याच महिन्यात 220 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना दर्जोन्नती दिली आणि आता त्यापैकी 10 रस्त्यांच्या नुतनीकरणासाठी तब्बल 28 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन कराड दक्षिण मतदारसंघावर राज्य सरकारची विशेष मेहेरनजर असल्याचे दाखवून दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)