कराड तालुक्‍यात गटसचिवांचे कामबंद

कराड – तळबीड, ता. कराड येथील विकास सेवा सोसायटीत गटसचिव अधिकाराव थोरात यांना संस्थेच्या सभासदाने शिवीगाळ व दमदाटी केल्याची नुकतीच घटना घडली. या प्रकरणी कराडमधील गटसचिवांनी मासिक सभेवर बहिष्कार टाकत आरोपीवर कारवाई होत नाही, तोपर्यंत कराड तालुक्‍यातील सर्व सेवा सोसायटीच्या गटसचिवांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे निवेदन गटसचिवांनी कराड तालुका उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण यांना बुधवारी दिले असून, या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत निवेदनाद्वारे दिलेली माहिती अशी, तळबीड, ता. कराड येथील विकास सेवा सोसायटीत गेल्या बारा वर्षांपासून गटसचिव म्हणून कार्यरत असणारे अधिकराव थोरात हे नेहमीप्रमाणे संस्थेचे कामकाज करत असताना संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सभासद संदीप बाळासो मोहिते व प्रदीप बाळासो मोहिते यांना पुरवणी पीक कर्जासाठी कमाल मर्यादा पत्रकात नाव समाविष्ट करण्यासाठी संपूर्ण क्षेत्राचे सातबारे व खाते उतारा आवश्‍यक असल्याचे थोरात यांनी सांगितले. या सभासदांनी पुरवणी पीक कर्ज मागणीसाठी एकाच गटाचे सातबारा व खाते-उतारा घेऊन आले.

संस्थेचे सचिव थोरात यांनी सर्व धारण क्षेत्राचे उतारे आवश्‍यक आहेत, असे सांगितल्यावर सभासदांचा राग अनावर झाल्याने जिल्हा बॅंकेच्या खोडशी शाखेत सर्व कर्मचाऱ्यांसमोर शिवीगाळ करत दमदाटी केली. धोरणाप्रमाणे व नियमानुसार काम करत असतानाही सभासदांकडून शिवीगाळ व दमदाटी केल्याने गटसचिव अधिकराव थोरात यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या सभासदांवर कारवाई होत नाही तोपर्यंत जिल्हा बॅंकेच्या कार्यालयात होणाऱ्या सभेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)