कराडात वाहतूक शाखेतला सावळा गोंधळ उजेडात

वाहतूक शाखेचा स्वैर कारभार

सुधीर पाटील

कराड – जो कराडात गाडी चालवितो, तो कुठेही गाडी चालवू शकतो, असे म्हटले जाते. यातील गमतीचा भाग सोडला, तर असे का म्हटले जाते, यावरून शहरातील वाहतुकीची एकूण परिस्थिती लक्षात येते. 2001 साली शहर वाहतूक नियंत्रण शाखेला उपनिरीक्षक दर्जाच्या स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक झाली. उत्तम जगदाळे यांनी तो कार्यभार नावाप्रमाणेच उत्तमरित्या सांभाळला. आता या शाखेचा कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्याकडे आला आहे. वाहनांची वाढती संख्या आणि वाहतुकीवरील वाढता ताण पाहता भविष्यात कदाचित पोलीस निरीक्षक दर्जाचा स्वतंत्र अधिकारी सुध्दा नेमण्याची वेळ येऊ शकते.

कराडच्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या इतिहास आणि वर्तमानात काही चांगल्या आणि वाईट घटनांची नोंद झाली आहे. पोलीस खाते म्हटले की, सगळेच काही सरळ होत नसते. सद्‍रक्षणाय, खलनिग्रहणाय, या ब्रीद वाक्‍याच्या उलटा कारभार अनेकदा पहायला मिळतो. तरीही पोलिसांच्या चांगल्या कामगिरीलाही नजरअंदाज करता येत नाही. तथापि, केवळ प्रभुत्व स्थापन करणे म्हणजे नेतृत्व नव्हे.

जी व्यक्ती आपल्या समुहात उत्साह व शक्ती निर्माण करू शकते. ज्या व्यक्तीला पुढे येऊ इच्छिणाऱ्याला प्रोत्साहित करणे, प्रत्येकाच्या क्षमतेचा योग्य वापर करणे माहीत असते, अशी व्यक्ती चांगले नेतृत्व करू शकते, अशी नेतृत्वाची व्याख्या मेरी पार्कर फॉलेट यांनी लीडर ऍण्ड एक्‍सपर्ट या शोधनिबंधात केली आहे. नेतृत्व अनेक प्रकारचे असते.

प्रशासकीय व्यवस्थापनाचे एक महत्वाचे तत्व असते. प्रशासनाची समस्या म्हणजेच नेतृत्वाची समस्या, असे म्हटले जाते. त्यामुळे नेतृत्व खमके असल्याशिवाय प्रशासन सुरळीत चालत नाही. नेतृत्व नेभळट आणि स्वत:च्या कौतुकात रमणारे असले तर प्रशासनात अंदाधुंदी माजायला लागते. त्याचा परिणाम संपूर्ण समूहावर होऊ लागतो.

कराड पोलीस उपविभागातील कराड हे मुख्य पोलीस ठाणे. कराड हे सर्वार्थाने पुढारलेले शहर. वाढत्या शहरीकरणासह वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीच्या नियंत्रणाची मोठी जबाबदारी वाहतूक नियंत्रण शाखेवर आहे. या शाखेत सध्या 1 अधिकारी, 35 पुरूष आणि 5 महिला पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत.

शाखेचा कारभारी नवनव्या संकल्पना राबविण्याचा प्रयत्न करत असताना वाहतूक शाखेतील काही कर्मचारी आपल्या वाचाळपणाने त्यावर पोतेरा रिवत आहेत. त्यामुळे चांगल्या कामाचे कौतुक होण्याऐवजी वाईट कामाचीच चर्चा अधिक होत आहे. पंधरा वर्षापूर्वी याच वाहतूक शाखेतील एकाने मोक्का गुन्ह्यातील आरोपीच्या जप्त केलेल्या जीपचे टायर काढून स्वत:च्या वडाप जीपला घातले होते. त्या वैराट-सैराट कर्मचाऱ्याच्या प्रतापामुळे ही शाखा त्यावेळी प्रचंड बदनाम झाली होती. नंतर उत्तम जगदाळेंनी या शाखेची घडी नीट बसविली.

त्यांच्यानंतर हरिष खेडकर, धनंजय पिंगळे, सुनील दोरगे, प्रदीप खाटमोडे अशा अधिकाऱ्यांनीही या शाखेची उत्तमरित्या धुरा सांभाळली. सध्याचे संभाजीराव गायकवाडही नवनव्या उपक्रमांची जोड देऊन वाहतूक शाखेचे कामकाज अद्ययावत करण्याच्या धडपडत आहेत.

तथापि, काही कर्मचाऱ्यांना उकिरड्यावर तोंड मारण्याची सवय जडल्यामुळे सरळे मुसळ केरात जात आहे. याची उपविभागाच्या प्रमुखांनी नोंद घेणे गरजेचे आहे. केवळ नोंद घेऊन न थांबता त्यांच्या मुसक्‍याही आवळल्या पाहिजेत. मात्र, सगळे डोळ्यावर येऊनही नेतृत्व कच खात असल्याने सामान्यांनी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)