कराडात नोव्हेंबरमध्ये अ.भा. पक्षीमित्र संमेलन

कराड : लोगोच्या अनावरण प्रसंगी महेंद्रकुमार शहा, दीपक वाटेगावकर, सुधीर एकांडे, रोहन भाटे व नाना खामकर. (छाया : राजू सनदी)

कराड, दि. 22 (प्रतिनिधी) – येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात दि. 23 व 24 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे 2 रे अखिल भारतीय आणि 32 वे राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कराड जिमखान्याचे अध्यक्ष महेंद्रकुमार शाह, जनरल सेक्रेटरी सुधीर एकांडे आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष रोहन भाटे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिमखाना उपाध्यक्ष दीपक वाटेगावकर, निसर्ग विभागप्रमुख नाना खामकर उपस्थित होते.
महाराष्ट्र पक्षीमित्र संयोजित संमेलनात महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ- नागपूर, महाराष्ट्र वन विभाग-सातारा, सह्याद्री व्याघ्र राखीव-कोल्हापूर, या संस्थांचा सहभाग आहे. पक्षी, निसर्ग जतन व संवर्धन, या विषयावर नामवंतांची व्याख्याने, पक्षी अभ्यासक, वनरक्षकांची चर्चासत्रे, प्रकट मुलाखत, स्लाईड शो, फिल्म शो, छायाचित्र प्रदर्शन व स्पर्धा, प्रबंध सादरीकरण, अशा भरगच्च कार्यक्रमाचे संमेलनात आयोजन करण्यात येणार आहे. संमेलनाचे उद्घाटन सिक्किमचे माजी राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. संमेलनास कोल्हापूरचे मुख्य वन संरक्षक तथा सह्याद्री व्याघ्र राखीवचे क्षेत्र संचालक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, उपसंचालक डॉ. विनिता व्यास, सातारचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, राज्य जैवविविधता मंडळाचे चेअरमन डॉ. विलास बर्डेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव अश्रफ अहमद आणि राज्य पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर हे उपस्थित राहणार आहेत. विविध राज्यांतील पक्षी अभ्यासक, वनरक्षक व निसर्ग संवर्धक मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी होणार आहेत. निसर्गचक्रातील पक्षी वैभव टिकवणे, जतन करणे, या हेतूने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी हा घटक समोर ठेवून विविध उपक्रमांचे विनामूल्य आयोजन केले आहे. संमेलनाच्या निमित्ताने निसर्ग, पर्यावरण व पक्षी, या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)