कराडात खासगी सावकारावर गुन्हा

कराड, दि. 16 (प्रतिनिधी)- व्याजाच्या पैशापोटी तारण घ्यायच्या जमिनीचे गहाणखत करण्याच्या नावाखाली दाम्पत्याची फसवणूक करून जमिनीचा दस्त केला. तसेच व्याजाने दिलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम वसूल करूनही छळ करणार्‍या खासगी सावकाराविरूध्द शहर पोलीस ठाण्यात खासगी सावकारी आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. सागर नलवडे (रा. मंगळवार पेठ, कराड), असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी मधुकर आबा सुपनेकर (वय 55, रा. हिंगनोळे, ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिंगनोळे येथील मधुकर सुपनेकर व विमल सुपनेकर या दाम्पत्याला वडिलोपार्जित जमिनीचे हक्क सोडपत्र करून घेण्यासाठी 5 लाख रुपयांची गरज होती. हे दांपत्य जमिनीचे उतारे काढण्यासाठी कराड तहसील कार्यालयात आले असता त्यांची भेट अधिकराव दुपटे (रा. आटके, ता. कराड) यांच्याशी झाली. सुपनेकर दाम्पत्याने दुपटे यास पैशाची गरज असल्याचे सांगितले. त्यावर दुपटे यांनी येथील मंगळवार पेठेतील सागर नलवडे हा व्याजाने पैसे देतो आणि तो माझ्या ओळखीचा असल्याचे सांगितले. त्यानंतर दुपटे याने सुपनेकर दांपत्यास सागर नलवडे याच्या मोबाईल शॉपी दुकानात घेऊन गेले आणि व्याजाने पैसे मागितले. पैसे देतो, पण तुम्हाला सोने तारण ठेवावे लागेल, असे त्याने सांगितले. सुपनेकर दाम्पत्याकडे दागिने नसल्याने जमीन तारण ठेवण्याची तयारी त्यांनी दर्शविली. म्हणून नलवडे याने दाम्पत्याला जमिनीचे उतारे घेऊन दुसर्‍या दिवशी कराड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात यायला सांगितले.
साबळेवाडी (ता. कराड) येथील 50 गुंठे जमिनीचे उतारे घेऊन ते दि. 28 फेब्रुवारी 2017 रोजी 11.30 वाजता दुय्यम निबंधक कार्यालयात आले. सागर नलवडे यांनी जमिनीचे स्टॅम्प तयार करून आणले व त्यावर सुपनेकर दांपत्यास सही करण्यास सांगितले. स्टॅम्पवर लिहिलेल्या मजकुराबाबत सुपनेकर दांपत्याने विचारणा केली असता गहाण खत केले आहे, असे सांगून दस्त करून घेतला. सुपनेकर दांपत्यास त्याने दीड लाखाचे चेक व दीड लाख रुपये रोख, असे तीन लाख रुपये दिले.
त्यानंतर मार्च ते ऑक्टोबर 2017 दरम्यान दरमहा 45 हजार रुपये असे एकूण 3 लाख 60 हजार रुपये सागरला सुपनेकर दाम्पत्याने परत केले. त्यानंतर आर्थिक परिस्थिती खालावल्याने नोव्हेंबर व डिसेंबर 2017 महिन्याचे व्याजाचे पैसे थकल्यानंतर नलवडे याने व्याजाचे पैसे आता जमा करा नाही, तर तुम्हाला दंड बसेल, असे सांगितले. चार महिन्याची मुदत मागितली. नंतर दंडासह सात लाख रुपये झाल्याचे सागर याने सांगितले आणि पैसे वसूल करण्याची धमकी दिली. त्यानंतर साबळेवाडी येथील शेतात पाणी पाजण्यासाठी सुपनेकर दाम्पत्य गेले असता तुमची जमीन स्वातुल्यकुमार सूर्यवंशी (कराड) याच्या नावावर असून ती विकायला काढली आहे. आम्ही ती जमीन पाहायला आलो असल्याचे एका इसमाने त्यांना सांगितले. त्यामुळे सदरचा प्रकार सुपनेकर दाम्पत्याच्या लपात आला. त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातून कागदपत्रांच्या नकला काढल्यानंतर सागर नलवडे याने गहाणखताऐवजी खरेदी दस्त केल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक जमीनीचा दस्त करून, व्याजासह दुप्पट पैसे वसूल करून मानसिक छळ केल्याप्रकरणी सुपनेकर दांपत्याने रविवारी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सागर नलवडे याच्यावर खासगी सावकारी आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)