कराडला पक्षी संशोधन केंद्र उभारावे : ना. चरेगांवकर

पक्षीमित्र संमेलनात आवाहन

कराड – देव-देवता, धर्मसंस्कृती व ग्रंथामध्येही पक्ष्यांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे निसर्गाचा मूळ गाभा सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. कोणताही उपक्रम यशस्वी करायचा असेल तर त्यात लोकसहभाग महत्त्वाचा असतो. या उपक्रमातही लोकांना सामावून घेतल्यास पशुसंवर्धन व संरक्षण अधिक सुकर होऊ शकेल. नव्या पिढीलाही जास्तीत-जास्त या उपक्रमात सामावून घ्यावे. त्याचबरोबर सर्व पक्षीमित्रांनी एकत्रित येवून कराड येथे पक्षी संशोधन केंद्र उभारावे, असे आवाहन राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगांवकर यांनी केले.

महाराष्ट्र पक्षीमित्र व कराड जिमखान्याच्या वतीने येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात आयोजित करण्यात आलेल्या 2 रे अखिल भारतीय व 32 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी किशोर रिठे होते. यावेळी मुख्य वन संरक्षक सुनिल लिमये, व्ही. सी. बेन, अरविंद पाटील, डॉ. जयंत वडतकर, दत्ता उगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. चरेगांवकर म्हणाले, कोणत्याही गोष्टीचा प्रसार व प्रचार करणे हे एक आव्हानात्मक काम असते. त्यामुळे संमेलनाचा मूळ गाभा विसरुन त्याला उत्सवाचे स्वरुप प्राप्त होऊ नये. याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. संमेलने ही मोठी होत राहतील. पण त्याची स्वायतत्ता तुमच्याकडे कशी राहील याचा विचार होणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे पंढरपूरला जाणारी वारकऱ्यांची वारी ही लोकचळवळीतून मोठी झाली, त्याचप्रमाणे पक्षीमित्रांची चळवळ मोठी होणे गरजेचे आहे. त्यात लोकांचा सहभाग वाढवावा. प्रचार आणि प्रसार करत असताना पक्षीमित्रांनी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कार्टुन फिल्म, सोशल मिडियावर पाहता येण्यासाठी वेब सिरीज तयार करण्याबाबत गांभिर्याने विचार करावा. व ही लोकाभिमुख चळवळ उभी करावी, असे आवाहन त्यांनी केले. किशोर रिठे म्हणाले, पक्षी हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे.

सकाळी झोपेतून उठविणाऱ्या कोकीळपासून तर बुलबुल, सुभग, सूर्यपक्षी असे सारे पक्षी आपला संपूर्ण दिवस आनंददायी जावा. यासाठी आपल्या कानावर आणि मनावर नाद मधुर संगिताचे स्वर उमटवीत असतात. कीटकांचा फडशा पाडून मानवी आरोग्यास पोषक वातावरण निर्माण करणे व कृषी अवस्थेत शत्रूकिडींचा नाश करुन मनुष्य प्रजातीस मुबलक अन्नधान्य पुरविण्याचीही महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षी सांभाळत आहेत. असे असले तरी माणूस व पक्षी यांनी अनाधी कालापासून जोपासलेले हे नाते पुढे अनंत काळ सुरु राहील असे सांगता येत नाही. तसेच ना. चरेगावकर यांच्या सूचनांबाबत पक्षीमित्र गांभिर्याने विचार करतील असे सांगितले. तसेच पक्षी संशोधन केंद्राबाबतही आवश्‍यक तो प्रस्ताव सादर करण्याबाबत सर्वसमावेशक निर्णय घेण्याचे सूतोवाच करत पक्षीमित्र संमेलनाची अवस्था साहित्य संमेलनासारखी होऊ नये, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे रिठे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जयंत वडतकर, सुनिल लिमये यांच्यासह जिमखान्याचे अध्यक्ष महेंद्रकुमार शहा यांचेही भाषण झाले. जनकल्याण विद्यामंदिरचे मुख्याध्यापक राजेंद्र अलोणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राज्यभरासह देशभरातील पक्षीमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)