कराडमध्ये मोरया’च्या गजरात प्रतिष्ठापना

कराड : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष व ढोल-ताशांच्या निनादात रिमझिम पावसात कराड शहर व तालुक्‍यात विघ्नहर्त्या गणरायाचे वाजतगाजत उत्साहात आगमन झाले. घरोघरी व सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्‍या बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांनी शहरात गर्दी केली होती.
कुंभारवाडा, नाना-नानी पार्क व मलकापूर परिसरात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मूर्ती नेण्यासाठी गर्दी केली होती. पाऊस असूनही गणेशभक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. शाळा, महाविद्यालये, विविध संस्था, शासकीय कार्यालयांच्या गणेशमूर्ती वाजतगाजत नेण्यात आल्या.
वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी पोलिसांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केले. वाहनांची गर्दी असतानाही भाविक शिस्तीने गणेशमूर्ती घेऊन जात होते. अगरबत्ती, हळद-कुंकू, पुष्पहार, फळे, पत्री हे पूजेचे आणि सजावट साहित्य खरेदीसाठी बाजारपेठा भाविकांनी फुलल्या होत्या.
कराड शहर व तालुक्‍यात 525 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून 35 गावांमध्ये एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवला जात आहे. बहुतांशी मंडळांच्या गणेशमूर्ती येथेच तयार केल्या जातात. अनेक मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. गणेशोत्सवासाठी शहरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
गणेशोत्सवानिमित्त शहर व परिसरातील गणेश मंदिरे सजवण्यात आली आहेत. अनेक मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी भाविकांनी मंदिरात जाऊन श्रीचे दर्शन घेतले. मंदिरांमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)