कराडच्या प्रीतीसंगम उद्यानाची पर्यटकांना भुरळ

कराड :स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळावरून दिसणारे प्रीतीसंगम उद्यानाचे विहंगम दृश्य.

क्रेझ वाढली : साहेबांच्या समाधीचीही भेटी लागे जीवा

राजेंद्र मोहिते

कराड, दि. 12 (प्रतिनिधी) – कृष्णा-कोयनेच्या संगमावर काही वर्षांपूर्वी कराड नगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयांच्या निधीतून प्रसिद्ध प्रीतीसंगम उद्यानाची निर्मिती करण्यात आली. या उद्यानाची स्वामींची बाग म्हणूनही ओळख असून अत्यंत सुंदर, निवांत अशी बाग वसवली आहे. त्यामुळे उद्यानात बालचमुंसह थोरा-मोठ्यांना एक हक्काचा विरंगुळा पालिकेने निर्माण केला आहे. या उद्यानातील हिरवागार गालीच्या, दाट वृक्षराजी, कृष्णा-कोयनेवरून वाहणारा थंडगार वारा आणि प्रसन्न शांतता. यामुळे हे उद्यान अल्पावधीतच प्रसिद्धीस आले आहे. त्यामुळे या सगळ्या स्वर्गसुखाचा येथे एकत्रित संगम झाल्यामुळे प्रीतीसंगम उद्यानाची पर्यटकांना भुरळ पडते आहे.
ऐतिहासिक आणि पौराणिक दृष्टीने कराडचे स्थान महत्वपूर्ण आहे. अनेक पुरातन मंदिरांसह एक भुईकोट किल्लाही शहराच्या वैभवात भर घालतो. ही ठिकाणे प्रीतीसंगमानजिकच वसली आहेत. जगप्रसिद्ध कृष्णा-कोयनेच्या संगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ, तरुणाईला भुरळ पाडणारी बाग आहे, त्यामुळे तरुणाईसह लहान मोठ्या सर्वांचेच हे आवडते ठिकाण बनले आहे. आशिया खंडातील दोन नद्यांचा समोरासमोर संगम होणारे हे एकमेव ठिकाण आहे. त्यामुळेही कराडची जगभरामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरच्या माथ्यावर उगम पावणाऱ्या कृष्णा-कोयना या भगिनी कराडक्षेत्री गळाभेट घेऊन कृष्णाप्रवाह मार्गस्थ होतो. तिच्या तीरावर कराडचे ग्रामदैवत कृष्णामाई वसले असून भाविकांचीही मोठी वर्दळ असते. पाणीपातळीत वाढ झाल्यावर संगमावर नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या नौकाविहाराचा आनंदही खुणावतो आहे. परिणामी हे उद्यान तिन्ही ऋतूतही गजबजलेले दिसते. उद्यानाने नुकतीच कात टाकली असून पावसाळ्याच्या हिरवाईमुळे उद्यानाला चांगलाच बहर आला आहे.

मोहक दृश्‍यांच फॅड सेल्फीलाही लावतयं याड…
प्रीतीसंगम उद्यानाच्या हिरव्यागार गालिच्यावर विविध प्रकारच्या वृक्षराजीमधून डोकावणारी सूर्यकिरणे उद्यानाचे सौंदर्य खुलवतात. स्व. चव्हाण साहेबांचे समाधीस्थळ व परिसरात लाल दगडांच्या विशिष्ट बांधकामामुळे या बागेला चार चॉंद लावले आहेत. उद्यानाच्या संरक्षक भिंतीवर ठेवण्यात आलेली बाकडी व उभारण्यात आलेले रेलिंग येथून नद्यांचा संगम व परिसराचे विहंगम दृश्‍य नजरेस पडत असल्याने पर्यटक गर्दी करतात. या सर्व मोहक दृश्‍यांना कॅमेऱ्यात कैद करण्याचे पर्यटकांचे फॅड त्यांच्या कॅमेरा अन्‌ सेल्फीलाही याड लावत आहे. लहान मुले, युवक-युवती, नवदाम्पत्यांसह ज्येष्ठ मंडळींचेही येथे फोटोसेशन सुरू असते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)