कराडच्या “निर्भया’चा राज्यभर डंका!

कराड- एक महिला पोलीस अधिकारी आणि तीन महिला पोलीस कर्मचारी एवढेच मनुष्यबळ असणाऱ्या येथील शहर पोलीस ठाण्यातील निर्भया पथकाने गेल्या दोन वर्षात केलेल्या नेत्रदीपक कामगिरीमुळे कराडच्या निर्भया पथकाचा राज्यभर डंका आहे. सातारा जिल्ह्यात तर या पथकाची कामगिरी सर्वात सरस ठरली आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी घरगुती वादातून महाबळेश्‍वरमधील ऑर्थरसीट पॉईंटकडे आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या दाम्पत्याचा जीव कराडच्या निर्भया पथकातील रेखा देशपांडे यांच्या तत्परतेमुळे वाचला होता.

दिल्ली येथे युवतीवर झालेला सामुहिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली. नराधमांविरोधात सगळीकडे मोर्चे निघाले. आंदोलने झाली. त्यानंतर कोपर्डीच्या घटनेनेही समाजमन ढवळून काढले. यामुळे महिला, युवतींच्या छेडछाडीला प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने सर्व पोलीस ठाण्यांमध्ये निर्भया पथकाची स्थापना होऊ लागली. कराड शहर पोलीस ठाण्यात 16 ऑगस्ट 2016 रोजी निर्भया पथक स्थापन झाले. पोलीस उपनिरीक्षक रूपाली चव्हाण या निर्भया पथकाच्या प्रमुख असून कॉन्स्टेबल रेखा देशपांडे, पोलीस नाईक विनया वाघमारे आणि वैशाली कटरे यांचा या पथकात समावेश आहे.

महिला मेळावे, शाळा, कॉलेजमध्ये निर्भया समितीची स्थापना, निर्भया मोटरसायकल रॅली, दसरा सणानिमित्त “जागर स्त्री शक्‍तीचा’, विजय दिवस समारोहात निर्भया स्टॉल, द्वार प्रबोधन, निर्भया दौड, कृषी प्रदर्शनात निर्भया स्टॉलद्वारे प्रबोधन, रिक्षा, एस. टी. बसमध्ये निर्भयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करणारी स्टीकर्स लावण्याची कामे या पथकाने केली आहेत. याशिवाय महिला, युवतींच्या तक्रार अर्जांची चौकशी, वेळप्रसंगी समुपदेशनही केले जाते. मुंबई पोलीस कायदा, मोटर वाहन कायदा, कोटपा कायद्यान्वये अनेक जणांवर कारवाई केली आहे.

गतवर्षी एक वेडसर महिला आपल्या 12 वर्षाच्या मुलीला कृष्णा पुलावरून नदी पात्रात ढकलण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, निर्भया पथकाच्या प्रसंगावधानामुळे त्या मुलीचा जीव वाचला. निर्भया पथकाने त्या मुलीला सातारा येथील बाल अभिरक्षण गृहात दाखल केले. एका व्यापाराचा मुलगा व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याचे समुपदेशन करून व्यसनातून सावरण्यास मदत केली. आज तो मुलगा वडीलांना व्यवसायात मदत करत आहे. जीव देण्याच्या प्रयत्नात असताना तिला ताब्यात घेऊन तिचे समुपदेशन केले. नंतर तिला पालकांच्या ताब्यात दिले. एके ठिकाणी गल्लीत रात्री उशीरापर्यंत क्रिकेट खेळताना आरडाओरडा करणाऱ्या मुलांमुळे एका आजीला त्रास व्हायचा. याबाबतची तक्रार आल्यानंतर संबंधित गल्लीतील पालकांची बैठक घेऊन निर्भया पथकाने संबंधितांना इशारा दिला. त्यामुळे गल्ली क्रिकेट बंद झाली आणि आजीला होणारा त्रासही थांबला.

अशा पध्दतीने चोवीस तास सतर्क असणाऱ्या आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांना सामावून घेऊन प्रबोधन, कारवाई करून महिला, युवतींचा त्रास कमी करणाऱ्या निर्भया पथकाने दुसऱ्या वर्धापनदिनी “व्हॉटसऍप’वर तक्रार करा, मदत मिळवा’, असा नवीन उपक्रम सुरू केला आहे. यासंदर्भात शहरातील गर्दीच्या ठिकाणी बॅनर लावून त्यावर तक्रार नोंदविण्यासाठीचे क्रमांकही नमूद केले आहेत. या उपक्रमाला मुद्रित, इलेक्‍ट्रॉनिक आणि सोशल मीडियातून मोठी प्रसिध्दी मिळाली. त्यानंतर सोलापूर, इचलकरंजी, हिंगोली, ठाणे, मुंबई, नाशिक येथील महिला, पुरूषांनी कराडच्या निर्भया पथकाचे फोन करून कौतुक केले. तसेच आमच्याकडे अशी योजना सुरू कराल का, अशी विचारणार केली. शिवाय त्यांच्या असणाऱ्या अडचणींबाबत कराडच्या पथकाकडून मार्गदर्शनही घेतले. यावरून राज्यात अनेक ठिकाणच्या पोलीस ठाण्यात अद्यापही निर्भया पथकच कार्यरत नसल्याचे स्पष्ट होते.

गेल्या महिनाभरात निर्भया पथकाने कराडातील प्रीतिसंगम बाग, विद्यानगरच्या शाळा, महाविद्यालय परिसरात, मलकापूर येथे धडक कारवाईतून रोडरोमिओंची पळता भुई थोडी केली आहे. शहरातील वसतिगृहात भेटी देऊन मुलींशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. वसतिगृहात मुलींसाठी आवश्‍यक त्या सोयी-सुविधा आहेत की नाहीत, हेही जाणून घेतले. नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रमांमुळे कराडचे निर्भया पथक राज्य पोलीस दलात कराडची शान बनले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)