कराडकर मठाधिपतींचा निर्णय लांबणीवर

महत्वपूर्ण पुरावा सादर; 1 फेब्रुवारीला अंतिम निर्णय

कराड – येथील मारुती बुवा कराडकर मठाच्या पदावरुन निर्माण झालेल्या वादासंदर्भात शुक्रवारी धर्मादाय आयुक्तांसमोर अंतीम सुनावणी झाली. मात्र मठाधिपती बाजीरावमामा कराडकर यांनी यासंदर्भातील महत्वपूर्ण पुरावा सादर केल्याने मठाधिपतींचा आजचा निर्णय लांबणीवर गेला आहे.

कराडकर मठाचा मठाधिपती कोण, याचा वाद गेल्या अनेक महिन्यांपासून धर्मादाय आयुक्त, पुणे यांच्यापुढे चालू आहे. कराडकर मठाचे मठाधिपती भगवानमामा कराडकर यांच्या पश्‍चात गुरु-शिष्य परंपरेने बाजीरावमामा कराडकर हे काही महिन्यांपासून मठाधिपती म्हणून सेवा करीत आहेत. दरम्यानच्या काळात मठाच्या विश्‍वस्तांनी मठाधिपती म्हणून जयवंतबुवा पिसाळ यांची नेमणूक करुन तसा चेंज रिपोर्ट धर्मादाय कार्यालयाकडे सादर केला होता.

यावर मठाधिपती बाजीरावमामा कराडकर यांनी हरकत घेत गुरु-शिष्य परंपरेने आपणच मठाधिपती म्हणून काम करत आहोत, असा दावा केला आहे. यावर धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कराड येथे येऊन प्रत्यक्ष मठाची पाहणी केली. दाखल केलेल्या हरकतींच्या अनुषंगाने वारकरी, भाविक, विश्‍वस्त तसेच परिसरातील नागरिक, बाजीरावमामा यांचा धार्मिक विधी करणारे पुरोहित यांच्याकडे चौकशी करुन त्याबाबतचे लेखी जबाब नोंदवले होते. त्यानंतर मठाच्या विश्‍वस्तांनी व बाजीरावमामा यांनी आपले म्हणणे वकिलांमार्फत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सादर केले होते.

या सर्व बाबींचे अवलोकन करुन शुक्रवारी धर्मादाय आयुक्त पुणे यांच्यासमोर अंतीम सुनावणी होणार होती. मात्र शुक्रवारी बाजीरावमामा यांनी महत्वाचा पुरावा धर्मादाय आयुक्त यांना सादर केला आहे. याचे अवलोकन करुन याबाबतची अंतीम सुनावणी 1 फेब्रवारी रोजी होणार आहे.

मठाच्या विश्‍वस्तांनी दि. 31 जानेवारी 2017 रोजीच्या बैठकीत मठाधिपतीसाठी माझ्याच नावाचा उल्लेख केला असून तसा ठरावही सर्वानुमते घेतलेला आहे. या ठरावाची प्रत आम्हाला प्राप्त झाली असून ती वकिलांमार्फत धर्मादाय आयुक्तांना देण्यात आली आहे.

बाजीरावमामा कराडकर, मठाधिपती, कराड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)