कराडकरांच्या मानगुटीवरील शंभर फुटी रस्त्याचे भूत अखेर उतरले!

कराड, दि. 6 (प्रतिनिधी) – कराड शहराच्या सुधारित विकास आराखडाच्या माध्यमातून दत्त चौक ते बैलबाजारापर्यंतचा रस्ता शंभर फुटी करण्याची नगरविकास खात्याने जारी केलेली सूचना केली होती. ती रद्द करून दत्त चौक ते स्व. दादासाहेब उंडाळकर पुतळ्यापर्यंत शंभरऐवजी 50 फूट, तर उंडाळकर पुतळ्यापासून पुढे नगरपालिकेची हद्द संपेपर्यंत शंभरऐवजी 60 फूट रुंदीकरण करण्याची नवीन अधिसूचना नगर विकास विभागाने सोमवारी (दि. 5) जारी केल्याने कराडकरांच्या मानगुटीवरील शंभरफुटी रस्त्याचे भूत अखेर उतरले आहे. तसेच शंभर फुटी रस्त्याविरोधात कराडकरांनी कृती समितीच्या माध्यमातून उभारलेल्या लढ्यालाही यश आले आहे.
कराड शहराच्या 2014 मध्ये मंजूर झालेल्या सुधारित विकास आराखड्याच्या अनुषंगाने दत्त चौक ते मार्केट यार्ड गेट नंबर एकपासून पुढे कराड नगरपालिकेच्या हद्दीपर्यंत 30 मीटर म्हणजेच 100 फूट नियोजित रस्ता करण्यात आला होता. या भागातून जाणारी वाहतूक लक्षात घेता इतक्या मोठ्या रस्त्याची आवश्यकता याठिकाणी नसल्याने तसेच या रस्त्यामुळे व्यावसायिकांसह स्थानिक रहिवाशांना आर्थिक फटका बसणार होता. त्यामुळे शंभर फुटी रस्त्याला या परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध होता. त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये कराड नगरपालिकेने नागरिकांच्या व संघर्ष कृती समितीच्या मागणीनुसार 100 फूट रस्ता रुंदीकरणाचा आराखडा रद्द करून त्याऐवजी दत्त चौक ते स्व. दादासाहेब उंडाळकर पुतळ्यापर्यंत 50 फूट आणि उंडाळकर पुतळ्यापासून शेवटपर्यंत 60 फूट रुंदीकरण करण्याबाबतचा ठराव नगर विकास खात्याकडे पाठवून कराडचा सुधारित विकास आराखडा दुरुस्त करण्याची मागणी केली होती. यावर सर्व प्रशासकीय सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (दि. 5) नगर विकास विभागाने दत्त चौक ते दादासाहेब उंडाळकर पुतळ्यापर्यंत चा रस्ता 50 फूट व तिथून पुढील रस्ता 60 फूट रुंद करण्याच्या सुधारित आराखड्याचा अध्यादेश जारी केला.
याकामी ना. डॉ. अतुल भोसले, ना. शेखर चरेगावकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून ना. रणजीत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. आ. बाळासाहेब पाटील, आ. शंभूराज देसाई यांचेही याप्रश्नी सहकार्य लाभले. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी संघर्ष कृती समितीला सहकार्य केल्याने कराडकरांच्या मानगुटीवरील शंभर फुटी रस्त्याचे भूत उतरू शकले. लोकशाही आघाडीचे नेते सुभाषराव पाटील यांनी याप्रश्नी संघर्ष कृती समिती स्थापन करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)