करबुडवे कलाकार वठणीवर!

नोटीस जाताच 22 कोटींचे मुद्रांक शुल्क जमा

– गणेश आंग्रे

पुणे – नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माता आणि कलाकार यांच्यामध्ये करारनामा करणाऱ्या 98 कंपन्यांना मुद्रांक शुल्क भरणाच्या नोटीस बजावल्या होत्या. यातील 36 कंपन्यांनी सुमारे 22 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क शासन दरबारी जमा केले आहेत. यामुळे करबुडवेगिरी करणाऱ्यांना आळा बसणार असून शासनाच्या महसुलातही वाढ होण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र राज्य हे चित्रपट जगतामध्ये आघाडीवर आहे. मुंबई हे हिंदी चित्रपटसृष्टीचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे चित्रपट अथवा मालिकांचे निर्माते आणि कलाकार यांचे करार हे मुंबईमध्ये होतात. यामध्ये मोबदला किती दिला आहे, याची नोंद असते. चित्रपटसृष्टीतील करारनामे करणाऱ्या मुंबई येथे 98 कंपन्या आहेत. यांच्यामार्फत चित्रपटसृष्टीतील करारनाम्याचा दस्त तयार केला जातो. कलाकार अथवा इतर व्यक्ती यांना एकूण मिळालेल्या मोबदल्यावर 0.25 टक्के इतके मुद्रांक शुल्क भरणे आवश्‍यक असते. हे करारनामे मुंबई मध्ये होत असल्याने त्यावर मुद्रांक शुल्क भरणे अनिवार्य असते. मात्र अनेक कलाकार आणि अन्य लोक यावर मुद्रांक शुल्क भरत नाही. त्यामुळे ही करचुकवेगिरी रोखण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाने पाऊले उचलेली आहेत.

मराठी अथवा हिंदी मधील एका चित्रपटांमध्ये 500 पेक्षा अधिक लोकांचा सहभाग असतो. हिंदी चित्रपटामध्ये कलाकारांना मोठ्या प्रमाणावर मानधन दिले जाते. मानधनाची ही रक्कम लाखोंच्या घरात असते. त्याचबरोबर मराठी चित्रपटातील कलाकारांनाही आता चांगले मानधन मिळत आहे. निर्माता आणि कलाकार, तंत्रज्ञ यांच्याबरोबर संबधित चित्रपटासाठी करार करतो. यामध्ये आवश्‍यक त्या अटींबरोबरच मानधन अथवा मोबदला नमूद करण्यात येतो. या करारनाम्याच्या मोबदल्यानुसार आवश्‍यक ते मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाकडे जमा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता नोंदणी विभागाने कर बुडविणाऱ्यांचा शोध घेण्यास सुरूवात केल्याने नोंदणी विभागाकडे कर जमा होत आहे.

51 लाख रु. अजूनही बाकी
मुंबई येथे करारनामे करणाऱ्या 98 कंपन्यांना नोंदणी विभागाने नोटीस बजावल्या होत्या. यातील 91 कंपन्यांनी नोटीसीला उत्तर दिले. तर 55 कंपन्यांनी त्यांकडील कलाकारांचे दस्त नोंदणी विभागास सादर केले आहे. प्रत्यक्षात मात्र 36 कंपन्यांनी 21 कोटी 80 लाख रुपयांचा कर शासनाकडे जमा केला आहे. तर चार प्रकरणांमध्ये 51 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क वसूल होणे बाकी आहे, अशी माहिती नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

यापुढे कारवाई आणि दंडही
बॉम्बे स्टॅंम्प कायदा 1958 च्या अंतर्गत जाहिरात व प्रसारणासंबंधी करार नोंदणी विभागाच्या कक्षेत येतो. चित्रपट, मालिका किंवा जाहिरातीमध्ये अभिनय करणे किंवा पैसे मिळण्यासाठी या उद्योगाला सेवा देणे ही प्रकारची सेवा आहे. सेवा देताना कलाकार निर्मात्यांसोबत करार करतात. आता या करारानुसार संबधितांना मुद्रांक शुल्क भरणे आवश्‍यक आहे. जे आवश्‍यक ते मुद्रांक शुल्क भरणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करून दंड आकारून ही रक्कम वसूल करण्याचा इशारा नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी दिला.

करारनाम्यावर लक्ष ठेवणार
चित्रपट, नाटक आणि मालिका यांतील कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यामध्ये होणाऱ्या करारनाम्यावर मुद्रांक शुल्क भरणे आवश्‍यक असते. मात्र अनेक कलाकार मुद्रांक शुल्क भरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडतो. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग चित्रपटसृष्टी अथवा मालिका यांमधील करारनाम्यावर लक्ष ठेवणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)