कर‘नाटकी’ नैतिकता (प्रभात ब्लॉग)

निवडणुकांत पराभव झाला, की इव्हीएम टेम्परिंगच्या नावाने गळे काढणाऱ्या नेत्यांनी कर्नाटक निवडणुकीत मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. कारण, सत्तेचा घास तोंडाशी आलेला. जर त्यात वेळ घालत बसलो, तर मणिपूर आणि गोव्याप्रमाणे भाजप संधी साधेल, ही भीती! शिवाय ज्या न्यायव्यवस्थेच्या नावाने बोटं मोडणाऱ्या मंडळीनी त्याच न्यायपालिकेत अर्ध्या रात्री दाद मागितली, यापेक्षा काय ते हाशिल? त्यामुळं आता इव्हीएम आणि न्यायपालिका हे पूर्वीप्रमाणे सक्रीय आहेत, यावर विश्वास ठेवण्यावर शिक्कामोर्तब झालं, हे कर्नाटक निवडणुकीचं फलित…लोकशाही जिवंत असल्याचं प्रमाणपत्रही या निवडणुकीनं आता दिलंय… 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल गेल्या मंगळवारी जाहीर झाले. एक्झिट पोल्समध्ये कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात ‘कांटे की टक्कर’ दाखवली जात होती. तर, किंगमेकर म्हणून जनता दल सेक्युलर (पक्षाने त्यांच्या नावात लावलेल्या ‘सेक्युलर’ शब्दाबाबत शंका) पक्ष पुढे येईल, असा सरळ अंदाज होता. इतर तुल्यबळ पक्ष रिंगणात नसल्याने एक्झिट पोल्स खरे ठरतील, असं वाटत होतं. पण, बाजी पलटली…सत्ताधारी कॉंग्रेसला मागे टाकत भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आणि तिथून खरी सर्कस सुरू झाली. सत्ता स्थापण्यासाठी भाजपनं राज्यपालांकडे जाण्याची घाई केली आणि तिथेच माशी शिंकली. तर, दुसऱ्या बाजूला गेली ५-६ दशकं देशावर राज्य करणाऱ्या कॉंग्रेसच्या हाती पंजाबनंतर एकमेव मोठं राज्य राहिलेलं कर्नाटक वाचवण्यासाठी जो आटापिटा केला, त्याला तोड नाही. मागील काही वर्षांचा इतिहास लक्षात घेतला, तर कॉंग्रेसमध्ये मरगळल्यासारखी अवस्था आहे. पण, कर्नाटक निवडणुकीने या पक्षात थोडा जीव आल्यासारखा वाटतो. कारण, पाणी गळ्यापर्यंत येतं, तेव्हा माकडीन तिच्या पिलाला पायाखाली घेते, या गोष्टीचा संदर्भ इथं घेता येईल. भाजपबद्दल तर काही बोलायलाच नको. समोर येईल त्याला गिळंकृत करण्यात धन्यता मानली जात आहे. साम-दाम-दंड-भेद हे प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र न वापरता एकत्र वापरले जात आहे. गुजरात आणि कर्नाटक निवडणुकांत हे दिसून आलं. (त्रिपुरा आणि गोवा ही राज्यं तुलनेने छोटी आहेत)

एकेक राज्य निसटून जाताना जी केविलवाणी अवस्था कॉंग्रेसनं स्वतःच्या हातून करून घेतली आहे, ती भारतीय राजकारणाच्या इतिहासात पुढची कित्येक वर्षे शिकवण घेण्यासारखी आहे. राज्य वाचवण्यासाठी आणि लोकशाहीचं समर्थन करण्यासाठी रात्री अडीच वाजता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याचे कौशल्य आणि चपळाई ही तर वाखाणण्याजोगीच! इतकी तत्परता सामान्य नागरिकांच्या बाबतीत गेली काही दशके कॉंग्रेसने दाखवली असती, तर आज या ऐतिहासिक पक्षाची ही गत झाली नसती. जेमतेम २० वर्षांपूर्वी असंतुष्टपणातून निर्माण झालेल्या पक्षाच्या युवराजाला मुख्यमंत्रीपदासाठी न मागता समर्थन देण्याचा मनाचा मोठेपणा कॉंग्रेसने दाखवला, हे म्हणजे जरा अतिच झालं.

गेल्या काही निवडणुकांत पराभव झाला, की इव्हीएम टेम्परिंगच्या नावाने गळे काढणाऱ्या नेत्यांनी कर्नाटक निवडणुकीत मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. कारण, सत्तेचा घास तोंडाशी आलेला. जर त्यात वेळ घालत बसलो, तर मणिपूर आणि गोव्याप्रमाणे भाजप संधी साधेल, ही भीती! शिवाय ज्या न्यायव्यवस्थेच्या नावाने बोटं मोडणाऱ्या मंडळीनी त्याच न्यायपालिकेत अर्ध्या रात्री दाद मागितली, यापेक्षा काय ते हाशिल? त्यामुळं आता इव्हीएम आणि न्यायपालिका हे पूर्वीप्रमाणे सक्रीय आहेत, यावर विश्वास ठेवण्यावर शिक्कामोर्तब झालं, हे कर्नाटक निवडणुकीचं फलित…लोकशाही जिवंत असल्याचं प्रमाणपत्रही या निवडणुकीनं आता दिलंय…कारण, मुख्यमंत्रीपदाचे दावेदार एच. डी. कुमारस्वामी यांचे वडील एच. डी. देवेगौडा हे फक्त ४६ खासदारांच्या जीवावर पंतप्रधान झाले होते आणि त्यांचे पुत्र आता ३७ आमदारांच्या बळावर मुख्यमंत्री होणार आहेत…कदाचित हीच काय ती लोकशाहीची किमया…!

बहुमत हाती नसताना आणि जेडीएस मदत करेल, याची अपेक्षा नसताना भाजपने जी चपळाई दाखवली, ती चित्त्यालाही लाजवेल अशी होती. अटलजींनी शिकवलेल्या नैतिकतेचे धडे गिरवणारे आम्ही पाईक, असा उठसूट आव आणत भाजपने रेस लावली खरी, पण घोडा काही उधळलाच नाही. त्याबदल्यात ‘औटघटकेचा राजा’ ही पदवी मात्र येडीयुरप्पा यांनी मिळवली..आपण राजा हरिश्चंद्राचे वंशज आहोत हे दाखवण्याची कुठलीही कसर भाजपने या साऱ्या सारीपाटात सोडली नाही. येडीयुरप्पा यांनी विरोधकांचे आमदार फोडण्याचे प्रयत्न का केले नसावेत? भाजप धुरिणांनी त्यांना साथ दिली नाही का? ‘शहा’णपणा चालला नाही का? याची उत्तरे शोधली असता पडद्यामागचं राजकारण खूप वेगळं आहे. ते इथं स्पष्ट करण्यात अर्थ नाही. पण, या निवडणुकीत सत्तेसाठी जो तमाशा झाला, त्याने अनेकांचे यथेच्छ मनोरंजन तर झालंच, त्या जोडीला अस्थिर आणि नैतिकतेचं ओंगळवाणं प्रदर्शनही झालं.

निवडणूक प्रचारात एकमेकांच्या नाकदुऱ्या काढणारे आता सत्तेसाठी मांडीला-मांडी लाऊन बसणार आहेत. पुढच्या वर्षी याच दिवसांत लोकसभा निवडणुका आहेत. तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून जाईल. कदाचित सत्तासंघर्षाचा ‘बिहार पॅटर्न’ कर्नाटकात दिसू शकतो. तसं झालंच, तर ते आश्चर्य न मानता ‘लोकशाहीचा विजय’ मानला पाहिजे.. कारण, जिसकी लाठी उसकीं भैस…कारण, पिक्चर अभी बाकी है!

ता.क. : या निवडणुकीच्या धामधुमीत भाजपच्या दोन माजी नेत्यांची सोशल मीडियात प्रचंड चर्चा झाली. त्यात पहिले म्हणजे एका मतासाठी सरकार पडू देणारे अटलबिहारी वाजपेयी आणि दुसरे लोकशाहीची व्यापक व्याख्या समजावून सांगणारे प्रमोद महाजन यांचे लोकसभेतील भाषण… जिज्ञासू व्यक्तीसाठी ही दोन्ही भाषणे यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत.

–  प्रसाद खेकाळे

(डिस्क्लेमर : या लेखात व्यक्त करण्यात आलेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी ‘प्रभात’चे व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही.)

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)