कमी मानधन; बंदोबस्तात मात्र वणवण

– नाना साळुंके

पुणे – गणेशोत्सव असो, की अन्य सण; आपत्ती, दुर्घटना अशा ठिकाणी होमगार्ड अर्थात गृहरक्षक दलाच्या जवानांचे सहकार्य नेहमीच मोलाचे असते. खाकी वर्दीतला हा जवान आपत्तीच्या ठिकाणी अहोरात्र पहारा देतो. हा जवान अशा प्रसंगी कुटुबांसमवेत सणाचा आनंद साजरा न करता समाजाचे रक्षण करत आहे. मात्र, या खाकी वर्दीतील दक्ष समजल्या जाणाऱ्या जवानाची शासन दरबारातील उपेक्षा अजूनही थांबलेली नाही. तुटपुंज्या मानधनात हा जवान अहोरात्र समाजाची सेवा करत आहे. हे मानधन वाढावे आणि अन्य सुविधांचा लाभ मिळावा यासाठी हा जवान आणि त्यांच्या संघटना शासन दरबारी प्रयत्न करत आहेत.

स्वत:च्या बंदोबस्तासाठी वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणाऱ्या शासनाला अजूनही होमगार्डची व्यथाच समजू शकली नाही. त्यामुळे या होमगार्डची अवस्था “कमी पगारी आणि फुल्ल अधिकारी’ अशीच झाली आहे. राज्यातील होमगार्ड दल हे राज्य पोलीस दलाचा कणा समजला जातो. शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकरणात वाढ झाली आहे. हे नागरीकरण वाढले असले तरी पोलिसांची संख्या तुटपुंजी आहे. त्यामुळे सण अथवा आपत्तीत बंदोबस्त पुरविताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळेच होमगार्डस्‌ला प्राधान्य देण्यात येते.

राज्यभरात लाखो होमगार्डस्‌मुळेच पोलीस दलाचा कामाचा ताण कमी होत आहे. मात्र, हे त्यांना फारशा सुविधा मिळत नाहीत. आश्‍चर्याची बाब म्हणजे त्यांना एका बंदोबस्तासाठी केवळ पाचशे ते सहाशे रुपये मानधन मिळत आहे. त्याशिवाय ज्या दिवशी काम, त्यादिवशी मानधन अशी त्यांची दयनीय अवस्था आहे. हा बंदोबस्त केल्यानंतर त्यांना त्याचे मानधन मानधन मिळण्यासाठी तब्बल तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागत आहे.

या मानधनात वाढ व्हावी, बंदोबस्तावर असताना आणि नसतानाही शासनाने किमान एक भत्ता ठरवून द्यावा, बंदोबस्तावर असताना किमान आहार भत्ता द्यावा तसेच गणवेशाचे कापड वेळेवर तसेच पुरेसे देण्यात यावे, अशा मागण्या होमगार्ड संघटनांच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहेत. मात्र, शासनकर्त्यांना अजूनही जाग आलेली नाही. राज्य शासनाच्या नियमानुसार, गृह विभागातील समाजाचे रक्षण करणाऱ्या जवानांना संप अथवा बंद पुकारणे शक्‍य नाही. बहुधा त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले नसावे. मात्र; त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास त्यांची नाराजी कोणतेही शासन दूर करू शकणार नाही हे निश्‍चित.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)