“कमळ’ फुलण्याआधीच गळाल्या “पाकळ्या’

वाईत भाजपचे नामोहरम होत असल्याची चर्चा
अनिल काटे
मेणवली, दि. 12 –
वाई तालुक्‍यातील “नमो’च्या काही निवडक व प्रमुख शिलेदारांनी कष्टाने व जिद्दीने वाई मतदार संघातील तलावात लावलेले “कमळ’ अंतर्गत मतभेदांसह गटबाजीमुळे पूर्ण बहरण्या अगोदरच कमळाभोवती आलेल्या काही “विक्रमी’ पाकळ्या निवडणुका येण्यापूर्वीच हळूहळू गळून पडू लागल्या आहेत. त्यामुळे वाईकराच्या तलावात कमळ फुलणार का? असा संभ्रमित प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. वाई मतदारसंघातील कमळावरील मालकी हक्काच्या श्रेयवादी संघर्षापायी संपूर्ण देशासह महाराष्ट्रात फुललेले “नमो” चे कमळ वाईकरांच्या तलावात स्थानिक बंडागळीमुळे चांगलेच नामोहरम होत असल्याचे बोलले जात आहे.
मुळातच वाई मतदार संघाचा इतिहास व भूगोल पाहता येथील जमिनीत कमळ रुजण्यासाठी कमळ विचाराच्या मातीचे तळे उपलब्धच नाही व कधी निर्माण करण्याचा कोणी प्रयत्नही केलेला नाही तर ते शोधून सापडणार कसे? त्यामुळे इथे असणारी सर्व जमीन “घड्याळा’च्या वेळेवर “हाता’ने कष्ट करणाऱ्यांच्या ताब्यात आहे. ती कमळ लागवडीसाठी ताब्यात कशी मिळणार याचे उत्तर शोधण्या ऐवजी कमळ तुझे का माझे या हक्क वादातच कमळाच्या फुलाचे हाल सुरू असल्याने कमळ फुलण्याऐवजी कोमेजून जावू लागले आहे.
केंद्रात व राज्यात भरघोस कमळाची फुले बहरली असली तरी सातारा जिल्हा मात्र याला एकमेव अपवाद ठरला असून येणाऱ्या काळात सातारा व कराडमध्ये कमळासाठी काही नवीन तळे मालकांची शोध निर्मिती सुरू असली तरी वाईमध्ये सध्यातरी कमळ लागवडीसाठी तळ्याचा मालक मिळू शकत नाही हे सांगण्याची गरज नाही.
मुळात वाई तालुक्‍यात कमळ रुजवण्यासाठी मेहनत घेणारी टाळकी ही बोटावर मोजण्याइतपतच आहेत. यातील कितीजण कमळाला खरेखुरे पाणी घालतात का पाजतात हे सांगण्याची गरज नसून ते सर्वश्रुत जगजाहीर आहे.
वाई तालुक्‍यात असणाऱ्या थोड्या फार कमळाच्या पाकळ्या पुण्याच्या बापटांचा हक्क सांगतात तर काही पाकळ्या कोल्हापूरकर पाटलांच्या मालकीच्या उर्वरित शिल्लक पाकळ्या पुणे स्थित किकलीकरांची मालकी सांगत असल्यामुळे सगळ्या पाकळ्या विस्कटल्या जावून कमळाचा देठ पुरता डळमळीत झाल्याचे चित्र वाईमध्ये पहावयास मिळत आहे.
जो-तो एकमेकांकडे बोट दाखवून दुसऱ्याच्या नावांचा शिमगा करत कमळाच्या मुळ्या ढिल्या करून टाकत आहेत. वाई तालुक्‍यातील कमळ रुजवण्याऐवजी त्याच्यावरचा मालकी हक्क सांगण्यावरून मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह कुरबुरी नेहमी ऐकायला व पहायला मिळत असल्यामुळेच कदाचित जिल्ह्यातील इतर तालुक्‍याप्रमाणे वाई तालुक्‍यात चांगले “कमळ” फुलवण्यासाठी “नमो” यांच्या दरबारातील एकाही मोठ्या सरदाराची मेहरबान नजर म्हणावी तशी फिरवली जात नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे. सुरुवातीला वाई शहराचे नगरपालिकेत ‘हाता’च्या मदतीने रुजलेल्या कमळाने नेहमी पेक्षा जास्तीचे पाणी पिण्याची घाई केल्याने रुजण्याआधीच वाईतील “कमळा’ची “प्रतिभा”धुळीला मिळाली ती पुन्हा फुललीच नाही.
देशभरात नमो कमळ बहरल्यावर वाईतालुक्‍यात ही बहर आणण्याकरिता पुढे सरसावत काही शिलेदार प्रयत्न करत असले तरी मुख्य दरबारातील सरदारांची म्हणावी तशी रसद मिळत नाही तर चुकून सरदारांची फेरी झालीच तर त्यांच्या बरोबर फोटो काढण्यातच शिलेदार गुंग होत असल्याने चढाओढीच्या राजकारणात कमळ वाढीकडे दुर्लक्ष झाल्याने वाई तालुक्‍यात कमळाने कधी उभारी घेतलीच नाही त्यामुळे वाईतील कमळाला वाढीसाठी योग्य ते खतपाणी मिळण्याऐवजी वाईच्या शिलेदारांची नुसती वाढलेली कुरघोडीच बिचाऱ्या “कमळा’ बाईला पहावी लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)