कन्फ्यूजन

    अबाऊट टर्न

जर तुमचे मित्रच तुम्हाला खाली खेचणारे असतील, तर मग शत्रूची काय गरज? अशा अर्थाचं एक सुभाषित आहे. केंद्रातली आणि राज्यातली स्थिती पाहिली तर हे अगदी चपखल पटतं. विरोधी पक्षांची गरजच काय, असा विचार करण्यास सरकारच्या मित्रांनीच भाग पाडलंय. अगदी मित्रपक्षातलेच नव्हे तर स्वपक्षातले लोकही सरकारवर शरसंधान करताना दिसतात. अर्थात, स्वपक्षीय टीकाकारांची फारशी दखल घेतली जात नाही म्हणा! ते आधीच बाजूला पडलेले. त्यांच्याकडे किती आणि काय म्हणून लक्ष द्यायचं! खरं तर टीका करणाऱ्या कुणाकडेही लक्ष द्यायचं नाही, हेच सध्याचं सूत्र आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अगदीच राज ठाकरेंसारख्यांनी नितीन गडकरींचे साबणाचे फुगे दाखवून दिले तरच मंजूर झालेल्या कामांची यादी घरपोच पाठवायची. विरोधी पक्षांना तर सध्या टीका करायचा प्रचंड कंटाळा आलाय. प्रत्येक प्रश्‍नाला “”तुमच्या काळात काय घडलं,” हे उत्तर बिचारे विरोधक तरी किती वर्षं ऐकणार! त्यातल्या त्यात अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्याच्या मुद्‌द्‌यावरून कोंडी होणार असं लक्षात येताच राज्य सरकारनं दोन पावलं मागे येण्याचं धोरण स्वीकारलं. शेतकऱ्यांच्या पंपांचं बिल वसूल करायचं नाही, असा निर्णय घेऊन विरोधकांचा पंप बंद केला. पण ज्यांना घरातूनच त्रास आहे, त्यांनी बाहेरची आक्रमणं थोपवून धरून काय फायदा! स्वपक्षातल्याच ज्येष्ठ नेत्यानं विधानसभेत उंदीर सोडला आणि सरकारची पळापळ झाली. कारण अस्तित्वही न दिसता पराक्रम गाजवणारा उंदीर हा एकमेव प्राणी.

मागे बिहारमध्ये दारूबंदी जाहीर केली तेव्हा हजारो लिटर दारू उंदरांनी पिऊन टाकली. बिहारमध्ये बांधलेल्या धरणांना छिद्रं पाडून पुराचं महत्त्वाचं कारण ठरले ते उंदीरच. त्यानंतर या प्रजातीनं मुंबईत पोलिसांनी पकडलेले लाखो रुपयांचे अंमली पदार्थ फस्त केले. रुग्णालयात जाऊन रुग्णांचे पाय कुरतडले. पण एकही उंदीर सापडला नाही. या टोळीचा निःपात केलाच पाहिजे, असा पण करून सरकारनं मंत्रालयापासून उंदीर मारण्याच्या मोहिमेचा शुभारंभ केला. (“श्रीगणेशा’ हा शब्द अँटीउंदीर मोहिमेसाठी उचित नाही.) या मोहिमेद्वारे एकट्या मंत्रालयातले 3 लाख 19 हजार 400 उंदीर अवघ्या सात दिवसांत मारण्यात आले. किमान कागदपत्र तरी तसंच सांगतात आणि हे कागदपत्र भाजपच्याच एकनाथभाऊ खडसेंनी विधानसभेत फडकावले.

दोन चांगले निर्णय घ्यावेत, तर त्याचा आनंद काही टिकू देत नाहीत लोक! शेतकऱ्यांच्या लॉंगमार्चचा विषय सरकारनं नुकताच यशस्वीरीत्या हाताळलाय. शिष्टमंडळाच्या बैठकीत सगळ्या मागण्या मान्य केल्यात. गारपीटग्रस्तांना भरपाई द्यायचा वायदाही नुकताच केलाय. पण प्रतिमा सुधारायचा जरा प्रयत्न केला की लगेच कुणीतरी पायात उंदीर सोडतोच! नाथाभाऊंचा उंदीर सरकारला चांगलाच भोवला. मित्रपक्ष हल्ली टपलेलाच असतो! उंदराला शेतकऱ्यांचा मित्र मानलं जातं आणि आता तो घोटाळेबाजांचाही मित्र झालाय, असं मित्रपक्षाकडून सांगितलं गेलं, तेव्हा आम्ही केवढे कन्फ्यूज झालो राव! आपली स्मरणशक्ती संपली की काय, असं वाटायला लागलं. वस्तुतः उंदीर हा शेतीचा शत्रू असून, त्यांना गट्टम करणारा साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे, असं लहानपणी वाचल्याचं आम्हाला अंधूकसं आठवतं. म्हणजे इथंही मित्र कोण आणि शत्रू कोण याबद्दल कन्फ्यूजन आहे तर!

– हिमांशु


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)