कथा सातारच्या उद्यानांची (भाग -2) ठेकेदारांची उद्यानं ही संकल्पना बदलणार का?

गुरुनाथ जाधव

सातारा – उद्याने ही शहरांची फुफुसे असतात. मोकळा श्‍वास व स्वच्छ हवा घेता यावी हा उद्यान निर्मीतीचा मुख्य उद्देश. सातारा शहरातील नगरपरिषदेच्या मालकीच्या उद्यांनाना ठेकेदारांची उद्याने असे संबोधण्यात येते. मुळात या उद्यानांना ठेकेदारी पध्दतीने चालवण्यासाठी दिल्याने त्यामध्ये अनेक चांगल्या उपाययोजना होणे अपेक्षीत होते. मात्र तसे आजपर्यंत झाल्याचे दिसत नाही.

नगरपरिषदेच्या माध्यमातून ठेकेदारी देताना नियम अटी व शर्थी घालून दिल्या असतात. या कराराचा भंग केल्यानंतर देखील सातारा नगरपरिषदेकडून संबधित ठेकेदारांची कायमच पाठराखण केली जाते की काय असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. ठेकेदारांना उद्यान सुपूर्द केल्यानंतर त्यावर नियंत्रण सातारा नगरपरिषदेचे व संबधित आधिकाऱ्यांचे असणे आवश्‍यक आहे. सातारा शहराच्या नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्याची प्राधान्याने त्यांची जबाबदारी आहे. मात्र या जबाबदारीचे पालन न केल्यामुळे उद्यानांची दयनीय अवस्था झाली आहे.

नगरपरिषदेच्यावतीने कोट्यावधी रूपये खर्चून देखील देखभाल दुरूस्ती व दुर्लक्षाने या उद्यानाची दुरावस्था झाली आहे. शाहुपूरी जकात नाका येथील हुतात्मा उद्यान हे 4 एकर 12 गुठे असे क्षेत्र असलेल्या या उद्यानात 360 मीटरचा सिंथेटिक ट्रॅक आहे. शाहुपूरी तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला, पुरूष, युवक युवती हजारोंच्या संख्येने उद्यानात सकाळी व संध्याकाळी चालण्यासाठी येत असतात. या उद्यानात रात्रीच्या वेळी फिरता यावे यासाठी सोलर पथ दिवे बसविले होते. मात्र त्या दिव्याच्या बॅटऱ्यांची चोरी झाली आहे. यामुळे रात्री लाईट बंद अशी अवस्था आहे. उद्यानामध्ये महिला तसेच पुरूषांना स्वतंत्र अशी शौचालयाची सुविधा नाही.

या उद्यानामध्ये एका विशिष्ट पध्दतीचे गवत लावण्यात आले होते. रात्रीच्या वेळी तळीरामांचा अड्डा या गवतावर ठाण मांडत असल्याने दारूच्या बाटल्यांचा खच पहायला मिळतो. आत्ता पाण्याच्या टाकी बांधण्याचे कामकाज मात्र सुरू करण्यात आले आहे. मात्र मोडकळीस आलेली बाकडी, काही ठिकाणी जळून गेलेली झाडे, वाढलेले गवत, आहे त्या कर्मचाऱ्यांना पूरेसा व वेळेत पगार न मिळणे अश्‍या अनेक बाबींमयामुळे या उद्यानांची दुरावस्था होत चालली आहे.

सातारा शहराची स्थापना करणाऱ्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या राजवाडा येथील उद्यानांचे नाव राखण्याचे काम देखील सातारा नगरपरिषदेला करता आले नाही. या उद्यानामध्ये मुळात जागेचा प्रश्‍न आहे. सुरूवातीला ही बाग प्रशस्त होती या नंतरच्या काळात बागेमध्ये जेष्ठ नागरिक भवन उभारण्यात आले. या उद्यानांमध्ये बसविण्यात आलेली खेळणी खुप वर्षापासून आहे तिच आहेत. काही खेळणी जीर्ण झाली आहेत. मात्र ती नव्याने बदलण्याचा प्रयत्न अद्यापतरी झाला नाही.

या बागेतील रेल्वे ही खरंतर बालचमुंचे आकर्षण. ते वगळता या बागेत विशेष असे काहीच केले नाही. राजवाडा चौपाटीवरतील झालेली बजबजपूरी मोठ्या प्रमाणावरती खाण्याच्या पदार्थाची गर्दी त्यातच अजूबाजूला घोडेवाले, काही गाड्या फिरवणारे यांची भर यामुळे बागेत खेळायला मुले जातात कुठे. राजवाडा उद्यानाला मोकळा श्‍वास घेण्यासाठी जागा शिल्लक राहिलीय कुठे ? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. आजूबाजूला होर्डिंगजचा विळखा आणि या ठिकाणी उद्यान कुठे हे ओळखा असे म्हणण्याची वेळ सातारावासियांना आली आहे.

सदरबझार येथील शहीद अशोक कामटे उद्यानात देखील मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य, दारूच्या बाटल्या, बसण्याची तुटलेली बाकडी, असेच चित्र दिसत आहे. पोलीस अधिक्षक बंगल्यासमोरील शहीद अशोक कामटे यांच्या बलिदानाची आठवण म्हणून या उद्यानाचे नामकरण झाले. मात्र त्याची देखभाल व व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. सातारा शहरातील उद्याने ठेकेदारांच्या स्वाधिन केली असली तरी त्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांची सोडवणूक देखील नगरपरिषदेनं करणे आवश्‍यक आहे. मुळात त्यांनी ज्या हेतूने ठेका घेतला तो साध्य होत नसल्याने देखील त्यांचे या उद्यांनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

ठेकेदार व नगरपरिषदयांच्या मधील कराराची उद्दिष्ट. नियम व अटी यांचे पालन न करणाऱ्या ठेकेदारांचे ठेके कायमस्वरूपी रद्द करणे आवश्‍यक आहे. नागरिकांच्या हिताच्या सोई सुविधा उपलब्ध करून देणे ही संबधित ठेकेदारांची जबाबदारी आहे. उद्यानामध्ये सातारा नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरणाची जबाबदारी महत्वाची आहे. पण याबाबत वृक्ष प्राधिकरण करते काय असा प्रश्‍न पडतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)