#कथाबोध : हावरा कटोरा

– डॉ. न. म. जोशी 

एक बैरागी होता. हाती कटोरा घेऊन तो भिक्षा मागत असे. त्यावर त्याची गुजराण होती. एकदा हा बैरागी हिंडत हिंडत एका राजाच्या राजधानीत पोहोचला. राजवाड्यासमोर उभा राहून त्यानं अलख निरंजन अशी आरोळी दिली. त्यावेळी राजा स्वतःच महालातून बाहेर येत होता. बैराग्याच्या हाती छोटा कटोरा होता. राजा खूप धनाढ्य होता. त्याला आपल्या संपत्तीचा गर्वही होता.

-Ads-

राजानं बैराग्याच्या कटोऱ्यात काही सुवर्णमुद्रा टाकल्या. त्या कटोरा भरून होत्या. पण त्या सुवर्णमुद्रा तळाशी जाताच कटोरा रिकामा झाला.
राजानं आणखी सुवर्णमुद्रा टाकल्या.
तरीही कटोरा रिकामाच.
शेवटी राजाचा सगळा खजिनाच रिकामा झाला.
“”आता मात्र माझ्यापाशी तुला देण्यासारखं काही नाही,” राजा हताशपणे म्हणाला.
बैरागी हसत होता.

राजाला वाटलं हा बैरागी जादूगार आहे. इतक्‍या सुवर्णमुद्रा आत टाकूनही कटोरा रिकामा कसा… राजा आश्‍चर्यचकित झाला. शेवटी राजानं विचारलं,
“”तू बैरागी आहेस की जादूगार आहेस?”
“”मी बैरागीच आहे महाराज. पण हा माझा कटोरा जादूचा कटोरा आहे.”
“”कसली जादू? कसला आहे हा कटोरा?”
“”हा कटोरा एका माणसाच्या कवटीचा बनविलेला आहे.”
“”काय? माणसाच्या कवटीचा कटोरा? तो तू इथं का आणलास?”
“”महाराज ही कवटी एका अत्यंत हावरट आणि लोभी माणसाची कवटी आहे.”
“”पण तू ती का जवळ बाळगतोय?”
“”लोकांना शिकवायला!”
“”काय शिकवतोस?”

“”माणसाला कितीही मिळालं तरी त्याचा लोभ सुटत नाही. बघा ना. या कवटीला किती सुवर्णमुद्रा मिळाल्या, या हावरट कवटीनं त्या गिळल्या.”
मग त्या बैराग्यानं ती कवटी उलटी केली.
त्यातून त्या सर्व सुवर्णमुद्रा खळाखळा बाहेर आल्या. त्यातली एक स्वतःच्या गरजेपुरती मुद्रा बैराग्यानं ठेवली. बाकीच्या राजाला देऊन टाकल्या.
काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षट्‌विकारांपैकी लोभ हा विकार माणसाचा मोठा शत्रू असतो. या लोभापायी माणूस अनेक संकटे ओढवून घेतो आणि जीवनातील खऱ्या आनंदाला पारखा होतो.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)