कथाबोध: सूर्यफुलांची गुरुदक्षिणा 

डॉ. न. म. जोशी 

पुण्यातील एका ख्यातनाम शाळेतील दहावीचा वर्ग! ओघवती वाणी असलेले कविहृदयाचे एक शिक्षक कविता शिकवीत होते. विद्यार्थी भारावून गेले होते. या तरुण चित्तवृत्ती शिक्षकाच्या वाणीनं वर्ग उल्हासित झाला होता. वर्ष संपलं त्या शिक्षकांचीही त्या शाळेतील भाकरी संपली. पुढे ते शिक्षक पुणे जिल्ह्यातील एका ख्यातनाम ग्रामीण महाविद्यालयात प्राध्यापक, प्राचार्य झाले. त्यांचे दोन-तीन कवितासंग्रहही प्रकाशित झाले. त्यांच्या वर्गातले हे शाळेतले विद्यार्थी पुढं पंखभरारी घेऊन निरनिराळ्या क्षेत्रात काम करू लागले. कुणी इंजिनियर, कुणी डॉक्‍टर, कुणी इंग्रजीचा नामवंत प्राध्यापक, कुणी कारखानदार, कुणी वकील, काहीजण तर परदेशातही स्थिरावले. मधे बरीच वर्षे झाली. ही सगळी मुलं… म्हणजे आताचे मोठे झालेले बाप्पे एकत्र आले. शाळेच्या जुन्या आठवणी निघाल्या. सरांचा कवितेचा तास सर्वांनाच आठवला आणि सगळेजण तुम्ही लहान होऊन पन्नास-साठ वर्षांपूर्वीच्या शाळेच्या वर्गातच जणू शिरले. त्यांनी आवर्जून या सरांना बोलावलं.

सरही आता पंच्याहत्तरी पार करून डोईवरील कृतांतकटकामलध्वज सांभाळीत काव्यमय जीवन जगत होते. एकदोन विद्यार्थ्यांनी विचार मांडला. “ज्यांनी आपल्याला कवितेचा उद्यानात नेऊन मायबोलीचा सुरेख फुलोरा परिचित करून दिला. त्या सरांना गुरुदक्षिणा द्यायची.’ सर्वांनुमते ठराव झाला. पण गुरुदक्षिणा काय द्यायची? हे सर्व विद्यार्थी आता इतके “श्री’मंत होते की, त्यांनी ठरवलं असलं तर पूर्वीचा काळाप्रमाणे सुवर्ण मोहरांचा थैलीसुद्धा ते देऊ शकले असते. पण त्यांनी वेगळाच विचार केला. त्यांनी सरांच्या सर्व कविता एकत्र केल्या. एकानं त्या संपादित केल्या. सुरेख मुखपृष्ठ तयार केलं आणि… सरांचाच कवितासंग्रह प्रकाशित करून त्यांनी आपल्या आवडत्या सरांना गुरुदक्षिणा म्हणून भेट दिला. ही आगळीवेगळी गुरुदक्षिणा! सर भारावून गेले. त्या कवितासंग्रहाचं नाव सूर्यफुले! कवी प्रा. सूर्यकान्त वैद्य, माजी प्राचार्य बोरा कॉलेज, शिरूर आणि ती शाळा म्हणजेच नूमवि वर्ष 1964 चे ते विद्यार्थी म्हणजे उद्योगपती अरुण कुदळे, प्रकाश कानडे, डॉ. श्रीधर गोखले, डॉ. ऋतुपर्ण नाईक, इ.

कथाबोध 
गुरुदक्षिणा ही केवळ द्रव्यरूपातच आली असे नाही तर त्या त्या व्यक्‍तीचा कर्तृत्वाची दखल घेऊन त्याप्रमाणे त्यांचा क्षेत्रातील कार्याचे दर्शन देणारी दक्षिणा हीही उत्तम गुरुदक्षिणा असते. या विद्यार्थ्यांनी मोहरा देण्यापेक्षा शब्दांचा मोहरांची थैली सरांना दिली!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)