#कथाबोध: सागर आणि नदी 

डॉ. न. म. जोशी 
प्राचीन काळची गोष्ट आहे. एका ऋषीच्या आश्रमात अनेक शिष्य ज्ञानग्रहण करीत होते. आचार्यांचे सर्वांकडं सारखंच लक्ष होतं. त्यांचा एक अनुज नावाचा शिष्य होता. बुद्धीनं चमकदार, वाणी खणखणीत. गुरुजी त्याचं कौतुक करीत. पण हळूहळू अनुज बदलू लागला तो इतरांपेक्षा स्वतःला महान समजू लागला. आचार्यांनी ओळखलं की याला अहंकार झाला आहे. पण त्याला त्याच्या अहंकारी स्वभावाबद्दल प्रत्यक्ष जाणीव न देता आचार्यांनी त्याचं वेगळ्या प्रकारे प्रबोधन करायचे ठरवलं.
मग एकदा आचार्य निसर्गभ्रमणाला निघाले. त्यांनी अनुजला बरोबर घेतलं. फिरता फिरता ते एका विशाल सागराच्या तीरी आले. आचार्य म्हणाले. “अनुज तुला आता तहान लागली असेल. इथलं पाणी पी.’
आचार्यांची आज्ञा म्हणून अनुज त्या सागराचं ओंजळभर पाणी प्याला. पण त्या अत्यंत खारट पाण्यानं त्याचं तोंड कसंतरी झालं.
आचार्य म्हणाले, “बघ अनुज, एवढा मोठा विशाल सागर. सगळं पोटात घेतो. पण थेंबभर पाणीसुद्धा लोकांची तहान भागवायला उपयोगी पडत नाही.’
“खरं आहे आचार्य!’ अनुज खाली मान घालून म्हणाला.
पुढे ते फिरता-फिरता एका नदीकाठावर आले. नदी संथपणे वाहात होती. तिचं स्वच्छ आणि नितळ पाणी डोळ्यांनाही सुखावत होतं.
“अनुज, आताही तुला तहान लागली असेल. नदीचं पाणी पी.’
अनुज आणि आचार्य दोघंही पुढं झाले. ओंजळीत ते अमृत घेतलं. एक घोट घेताच मन कसं शांत आणि तृप्त झालं. अजून तहान भागेपर्यंत पाणी प्याला. दोघंही पुढं चालत होते. आता आश्रमात परतण्याची वेळ झाली.
आचार्यांनी विचारलं, “अनुज आज आपण दोन जलाशयांवर गेलो. कोणत्या?’
“नदी आणि सागर’
“यातील मोठं कोण आणि लहान कोण?’
“सागर मोठा, नदी लहान.’
“पाण्याचा गुणधर्म कोणाचा अधिक उपयुक्‍त?’
“नदीचा.’ अनुज काय समाजायचं ते समजला त्या दिवसापासून त्याचा अहंकार नाहीसा झाला.
*** 
माणूस आकारानं मोठा की लहान, श्रीमंतीने अधिक की कमी. ज्ञानानं किती समृद्ध यावर त्याचं मोठेपण अवलंबून नसून तो गुणानं किती समृद्ध आहे आणि तो इतरांच्या किती उपयोगी पडतो त्याची महानता अवलंबून असते.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)