#कथाबोध: सर्वोत्कृष्ट शासक कसा ठरवायचा? 

डॉ. न. म. जोशी 
सम्राट अशोक हे प्रजाहितदक्ष सम्राट होते. त्यांच्या मनात एकदा असा विचार आला की, आपल्या विशाल राज्यात जी अनेक छोटी राज्ये आहेत त्यातील उत्कृष्ट शासकांना पुरस्कार द्यावा. त्याप्रमाणे सम्राटाने सर्वत्र दृष्टी फिरवली.
सम्राट अशोकाचा दरबार भरला होता. अनेक शासक आपले आपले शासकीय कर्तृत्व सादर करण्यासाठी तेथे आले होते. त्यांच्या निवेदपूर्वक सादरीकरणानंतर सम्राट अशोक उत्कृष्ट शासकाचा पुरस्कार जाहीर करणार होते.
एक शासक म्हणाले, “गेल्या पाच वर्षात माझ्या राज्याची तिजोरी दुप्पट भरली आहे. राजकोष आता खूप जमा झाला आहे.’
दुसरे शासक म्हणाले, “माझ्या कार्यकाळात मी शस्त्रास्त्र निर्मितीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे. त्यामुळे आपल्या सीमा सुरक्षित राहण्यासाठी चांगली मदत होणार आहे.’
तिसरे शासक म्हणाले, “माझ्या कार्यकाळात माझ्या राज्याचे इतर राज्यांशी दळणवळण वाढून व्यापार वृद्धी झाली आहे. त्यामुळे राज्याच्या व्यापारात खूप वाढ झाली आहे.’
चौथे म्हणाले, “माझ्या शासनकाळात मी साहित्य, संस्कृती, कला यांना खूप उत्तेजन दिले. मी कलावंताना खूप मानधन देऊन त्यांचा गौरव करतो. अनेक ग्रंथालये मी उघडली.’
सम्राट अशोक कौतुकाने या सर्व राजांची कर्तबगारी ऐकत होते. आता आणखी एक शासक उरले होते.
ते म्हणाले, “सम्राट महाराज, माझ्या राज्याची तिजोरी आता जवळजवळ रिकामी आहे. मी. शस्त्रास्त्रांच्या उत्पादनावर फार भर दिला नाही. व्यापाराला उत्तेजन दिले. पण त्यासाठी मी व्यापाऱ्यांना स्वावलंबी व्हायला शिकवले.
“मी अनुदाने देत नाही. उलट सर्वसामान्य प्रजेसाठी मी खूप खर्च करतो. रस्ते, विहिरी, अनाथालये, बागा, शेती, ग्रंथालये यासाठी मी खूप खर्च केला आता तिजोरीत खडखडाट आहे. माझ्या प्रजेवरही कसलेच कर्ज नाही आणि राज्याच्या तिजोरीवरही कर्ज नाही. पण प्रजा खूप सुखी आहे, हे नक्की.
सम्राट अशोकाने या शेवटच्या शासकाला सर्वोत्कृष्ट शासकाचा पुरस्कार दिला.
कथाबोध 
कोणत्याही शासन व्यवस्थेत राज्याच्या तिजोरीचा उपयोग सर्वसामान्य प्रजेचे कल्याण होऊन प्रजा सुखी कशी होईल याकडे केला पाहिजे. व्यापारवृत्ती, शस्त्रनिर्मिती अनुदाने हे उपक्रम करावेत. पण शेवटी त्यांचा उद्देश हा असावा राज्यातील शेवटचा माणूसही सुखी असला पाहिजे. प्रजेला सुखी करतो तो सर्वोत्कृष्ट शासक होय! असे शासक जेथे असतील त्या राज्यात विकासासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)